वाहने मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत

वाहने मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत

83164
इचलकरंजी : महापालिकेची कालबाह्य झालेली वाहने गॅरेजमध्ये उभी केली आहेत.

महापालिकेची १४ वाहने मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत
लिलाव प्रक्रिया खोळंबली; ऊन, पावसाच्या माऱ्याने वाहनांची आणखी दुरवस्था
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १२ : इचलकरंजी महापालिकेच्या १४ वाहनांची काल मर्यादा पूर्ण झाली आहे. मात्र, ती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून होणाऱ्या मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामधील काही वाहनांची काल मर्यादा पूर्ण होऊन दोन वर्षे कालावधी झाला आहे. या वाहनांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मूल्यांकन झाले नसल्याने त्यांची लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे. तर ही वाहने महापालिकेच्या गॅरेज विभागात उघड्यावर ठेवली असून ऊन, पावसाच्या माऱ्या‍मुळे त्यांची आणखी दुरवस्था होत आहे. निश्‍चित केलेल्या मूल्यांकनास ग्राहक घेण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे ही वाहने अशीच पडून राहण्याची शक्यता निर्माण होते.
शासकीय मालकी असलेल्या वाहनांना १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय त्यांना कालबाह्य ठरविते व त्यांच्या वापरावर निर्बंध घालते. अशा वाहनाच्या लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मूल्यांकन करून किंमत निश्‍चित करण्यात येते. त्यानुसार निविदा प्रसिद्ध करून लिलाव प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, अनेक वेळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वेळेत मूल्यांकन होत नसल्याने वाहनाची दुरवस्था होते व निश्चित केलेली रक्कम मिळण्यास अडचण निर्माण होते. सध्या इचलकरंजी महापालिकेच्या वाहनाच्या बाबतीत ही असेच होताना दिसत आहे. इचलकरंजी महापालिकेच्या मालकीच्या १४ वाहनांना १५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचा वापर बंद करण्यात आला आहे. यामध्ये अग्निशमन वाहन, मैला सक्षन, शववाहिका, हायड्रोलिक फ्लॅटफॉर्म, ट्रॅक्टरसह अन्य चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यामधील काही वाहने सुस्थितीत असून ही त्यांचा वापर थांबविला आहे. त्याच्या लिलाव प्रक्रियेकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मूल्यांकन आवश्यक आहे. मात्र, मूल्यांकन ठरविले नसल्याने महापालिकेचे लाखो रुपयांची अडवणूक झाली आहे. तर महापालिकेस आवश्यक वाहन खरेदी ही रेंगळल्याचे चित्र आहे.
------------------------------
चौकट
फिरत्या शौचालयांची विक्री होती रेंगळली
यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फिरत्या शौचालायाचे ४० हजार रुपये मूल्यांकन केले होते. तर स्क्रॅपधारक तीन ते पाच हजारदरम्यान घेण्यास इच्छुक होते. दोघांच्या किमतीमध्ये मोठा फरक असल्याने स्क्रॅपधारकांनी या लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरवली होती. परिणामी, ही शौचालयांची विक्री रेंगळली होती.
------------------
चौकट
कालबाह्य वाहन दृष्टिक्षेपात
अग्निशमन वाहन - ४
मैला सक्षन वाहन - २
शववाहिका - १
हायड्रोलिक फ्लॅटफॉर्म - १
ट्रॅक्टर - १
मोटारी - ५
----------------
पालिकेस आवश्यक वाहने
टँकर - ४
अग्निशमन वाहन - २
डंपर - २
-----------------
कोट
कालबाह्य वाहनांचे मूल्यांकन करून लिलाव प्रक्रिया शासनातर्फे होते. त्यातून मिळालेली रक्कम महापालिकेकडे वर्ग करण्यात येते.
- सौरभ साळुंखे, अग्निशमन, वाहन विभाग प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com