इचलकरंजीकरंजीच्या पाणी प्रश्नाचे पुढे काय

इचलकरंजीकरंजीच्या पाणी प्रश्नाचे पुढे काय

प्रचारात गाजला; कार्यवाहीची प्रतीक्षा
इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न; हेवे-दाव्यांच्या पुढे जाण्याची आवश्‍यकता
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १२ : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. आता निकालाची प्रतीक्षा असणार आहे. पण या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न राहिला आहे. प्रमुख उमेदवारांनी आपणच इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न सोडविणार असल्याचा दावा प्रचारावेळी केला आहे. त्यामुळे रखडलेला हा पाणी प्रश्‍न पुढील काळात तरी मार्गी लागणार काय, याची प्रतीक्षा इचलकरंजीकरांना असणार आहे. आता गरज आहे ती हेवे-दाव्यांच्या पुढे जात योजना मार्गी लावण्याची.
इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न सध्या अत्यंत संवेदनशील बनला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही योजना भविष्याचा विचार केल्यास सक्षम नाहीत. दोन्ही योजनांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. पंचगंगा योजना ही फारशी उपयुक्त नाही; तर कृष्णा योजना सक्षमीकरणाचे काम सुरू असले तरी ही योजना भविष्यात इचलकरंजीकरांची पूर्ण क्षमतेने तहान भागवू शकणार नाही. त्यामुळे भविष्यकालीन वेध घेतल्यास नवीन योजनेशिवाय पर्याय राहिलेला नाही.
विरोधामुळे वारणा योजना रद्द करण्यात आली. सुळकूड योजना मार्गी लागण्याची आशा असताना त्यालाही विरोध होत आहे. त्यामुळे या योजनेचे भवितव्य अद्याप तरी अधांतरी आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती योजनेबाबत वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करणार आहे. त्यानंतर योजनेबाबत निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर या योजनेबाबत शासन पातळीवर बैठक होऊ शकते.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न राहिला. पाणी प्रश्‍नाबाबत सतत चर्चा होत राहिली. प्रत्येक उमेदवारांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न मीच सोडविणार असल्याचा दावा केला आहे. यासाठी फेटा न बांधण्यासह पुन्हा निवडणुकीला उभे न राहण्याची घोषणाही करण्यात आली. पाणी योजनेबाबत वेगवेगळे पर्याय असल्याचेही उमेदवारांनी सांगितले. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शहराला शासन स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा शब्द इचलकरंजीकरांना दिला आहे.
या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी पाणी प्रश्‍नाला पुढील काळात गती निर्माण होण्याची आशा निर्माण झाली आहे. लोकसभेच्या दोन निवडणुका इचलकरंजी पाणी प्रश्‍नावरच गाजल्या. पुढील लोकसभा निवडणुकीतील प्रचारात पाणी प्रश्‍नाचा मुद्दा असणार नाही, कारण तोपर्यंत इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न मार्गी लागलेला असेल, अशी अपेक्षा इचलकरंजीकरांची आहे. प्रशासन आणि राजकर्ते यांनी समन्वयाने यामध्ये काम केल्यास पुढील काळात इचलकरंजीकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे शक्य होणार आहे.
-------------
चौकट
विधानसभा निवडणुकीनंतर गती शक्य
देशातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत आहेु तर तोंडावर विधान सभा निवडणूका आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न मार्गी लावणे सर्वांसमोर मोठे आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने हा प्रश्‍न जरी अधिक चर्चेत आला असला तरी विधानसभा निवडणुकीनंतरच या प्रश्‍नाला अधिक गती येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com