एक घर एक पुस्तक

एक घर एक पुस्तक

83348

पुस्तके मागणारा बालचमू अन् झिंगलेली तरुणाई

‘एक घर एक पुस्तक’ अभियान : सह्याद्री प्रतिष्ठानच्या रामानंदनगर शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्रातर्फे उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ : शिवजयंती मिरवणुकीत धांगडधिगा करणारी तरुणाई, मद्याचे घोट पोटात रिचवून झिंगलेली. साऊंड सिस्टिमवर नाचायला मिळते म्हणून बीभत्स नृत्य करणारी तरुणाई, तर दुसरीकडे दारोदार फिरून पुस्तके गोळा करणारा, वर्गणी नको, तर वाचण्यासाठी केवळ एक पुस्तक द्या, अशी हाक देणारा बालचमूंचा गट. त्याला समाजघटकांतून प्रतिसादही चांगला मिळाला. एक, दोन नव्हे तर तब्बल शंभर पुस्तके जमा झाली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या रामानंदनगर शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्रातील बालचमूंनी कृतिशील शिवजयंती व छत्रपती संभाजी महाराज जयंती कशी साजरी करावी, याचा दिलेला हा दाखला.
वस्ताद (कै.) शामराव अमृतराव जाधव यांनी दिलेला युद्धकलेचा वारसा प्रतिष्ठानतर्फे जपला जात आहे. दीड वर्षांपासून रामानंदनगर येथे युद्धकला प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. सुमारे तीस मुले-मुली येथे युद्धकलेचे धडे गिरवत आहेत. यंदा त्यांनी ‘एक घर एक पुस्तक’ अभियानांतर्गत रामानंदनगर परिसरातील घरोघरी जाऊन पुस्तके जमा करण्याचे ठरवले. इतिहास, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान, राष्ट्रपुरुषांची आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, आंतरराष्ट्रीय घडामोडींसह स्पर्धा परीक्षेविषयक पुस्तकांची सायंकाळी बालचमू प्रत्येकाच्या घरी जाऊन मागणी करत होता. ज्यांच्याकडे पुस्तके होती, त्यांनी लगोलग त्यांच्या हाती ठेवली. काहींनी थेट केंद्रात येऊन पुस्तके भेट दिली. त्यात राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टीक्षेपात, स्वामी विवेकानंद, अनोखी सहल, श्‍यामची आई, पुंडलिक चरित्र, भारतरत्न विश्वेश्‍वरय्या, राष्ट्रमाता जिजाऊ, वैज्ञानिकांच्या रंजककथा, आपले नेते, साऊ, जादूचं नातं, अहिल्याबाई होळकर, शिवराज्याभिषेक, सेनापती तात्या टोपे, भगवद् गीता आदींचा समावेश आहे.
----------------
कोट
राष्ट्रपुरुषांच्या जयंतीचा इव्हेंट झाला आहे. त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले जात नाहीत. नव्या पिढीला राष्ट्रपुरुषांचे विचार कळण्यासाठी वाचनसंस्कृती महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे अभियान राबविले. या पुस्तकांचे छोटे ग्रंथालय करून केंद्रातील मुला-मुलींनी आठवड्याला एक पुस्तक वाचावे, असा त्यामागचा उद्देश आहे.
- हेमंत साळोखे (अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान)
-------------------
चौकट
पुस्तक संकलनात यांचा सहभाग
तन्वी पिल्ले, समीक्षा शेळके, वेदिका खांडेकर, वैष्णवी मंडलिक, दिव्या माळवी, श्रुतिका मोरे, सानिका जाधव, राजवीर गुरव, यश गुरव, सिद्धेश सुतार, संग्राम काटकर, धनश्री पाथरुट, अथर्व सुरगोंड, आयुष पाथरुट, वरद शेळके, सम्राट भोसले, संतोष आकिसागर, जिया पिल्ले, अश्‍विनी भोसले, आरोही कदम, अंजली कांबळे, श्रद्धा चव्हाण, रिया जमादार, शुभ्रा काटकर, श्रावणी आतवाडकर, सना शेख, आराध्या घोरपडे, आयुष कुंदनगार, ईश्‍वरी पोवार, उत्कर्ष आतवाडकर, यश हलगल्ले, तन्मय पिल्ले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com