पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे आव्हान

पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे आव्हान

83438
गडहिंग्लज : शहरातील मटण मार्केट शेजारचा नाला अशा झाडा-झुडूपांनी वेढला आहे. दुसऱ्या छायाचित्रात लाखे नगरातील नाल्याची पालिकेतर्फे जेसीबीद्वारे सफाई केली. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे आव्हान
गडहिंग्लजमधील स्थिती; कार्यवाहीला गती अन् गटारींची स्वच्छता हवी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : शहरातील नाले, गटारी सफाईसाठी पालिकेची कार्यवाही सुरू असली तरी त्याला अजून गती येणे आवश्यक आहे. पावसाळा तोंडावर आल्याने ही गरज ठळक होत आहे. नाल्यांबरोबरच छोट्या-मोठ्या गटारींचीही सफाई आवश्यक ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम उरकणे पालिकेसमोर आव्हानाचे आहे.
तीन दिवसापूर्वी झालेल्या वळीव पावसाच्या पाण्याने सर्वांची झोप उडविली आहे. मे अखेरपर्यंत अजून बरेच वळीव बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पहिल्याच वळीव पावसाच्या जोरदार आलेल्या पाण्याने प्रशासनाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. शहरात शेरी, गिजवणे या मोठ्या नाल्यासह मटण मार्केट, लाखे नगर, पोतदार ले-आऊट, अर्बन कॉलनी ओढा आणि लहान-मोठ्या गटारींची संख्या अधिक आहे. याशिवाय वाढीव हद्दीत बांधकाम नसलेल्या गटारींच्या चरी मोठ्या प्रमाणात आहेत. वाढीव भागातील गटारींची समस्या गंभीर असल्याने प्राधान्याने तेथील कामे अटोपून घ्यावी लागणार आहेत. पहिल्याच वळीव पावसाने सांडपाण्याचे हे सारे स्त्रोत भरून वाहत होते. पावसाळ्यात यापेक्षाही अधिक गंभीर स्थिती उद्भवते.
दरम्यान, हे स्त्रोत विविध प्रकारचा कचरा, दगड मातीसह पत्रावळ्या, वाट्या अशा अनेक साहित्यांनी वेढले आहे. झुडुपेही वाढली आहेत. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येवून तळ्याचे स्वरूप निर्माण होते. काही ओढ्यामध्ये अतिक्रमणही आहे. अर्बन कॉलनी शेजारून वाहणारा ओढा अतिक्रमणामुळे अरूंद झाला असून दरवर्षीच्या पावसाळ्यात कॉलनीतील घरे व रस्त्यावर पाणी येते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची स्वच्छता पालिकेकडून होत असते. यावर्षीही ही कार्यवाही सुरू असली तरी त्याला अद्याप गती आलेली नाही. अजूनही बरेच महत्वाचे ओढे व गटारींचीस्वच्छता करणे शिल्लक आहे. एप्रिलपासून ही मोहिम सुरू झाली असली तरी अजून संपूर्ण शहरातील ओढे व गटारींची सफाई न झाल्याने नागरिकांत नाराजी वाढत आहे. त्याचे दर्शन पहिल्याच जोरदार वळीव पावसातील पाण्याने घडले आहे. यामुळे पालिका प्रशासनाकडून नाले, गटारी सफाईची कार्यवाही गतीमान करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
-------------
चौकट
महामार्ग कामातील माती तशीच
संकेश्‍वर-बांदा महामार्ग शहरातून गेला आहे. या कामात दोन ते तीन ओढ्यांचे नव्याने काम झाले आहे. काही ठिकाणी तेथील माती, दगड तसेच ओढ्यांच्या पात्रात पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी ती पात्रातून बाजुला करण्याची गरज आहे. पालिका प्रशासनाने त्याची पाहणी करून हे कामही तातडीने पूर्ण करून घेण्याची गरज आहे.
--------------
कोट
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून नाले सफाई सुरू केली आहे. लाखे नगर, मदिना मशिद, भडगाव रोड, पोतदार ले-आऊट आदी ठिकाणचे नाले सफाई केली आहे. शिल्लक नाले व गटारींच्या सफाईची कार्यवाही लवकरच करून घेणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही स्वच्छता मोहिम पूर्ण होईल.
- प्रशांत शिवणे, आरोग्य निरीक्षक, गडहिंग्लज नगरपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com