पर्यावरण वाचवाचे शिक्षण देणारे चनिशेटी विद्यालय

पर्यावरण वाचवाचे शिक्षण देणारे चनिशेटी विद्यालय

फोटो 83626, 83625


विद्यार्थ्यांचा उपक्रम छोटा, पर्यावरणाचा आदर्श मोठा
चनिशेटी विद्यालयात वाढदिवसादिवशी झाडांची भेट, रोपे तयार करण्यातही मुलांचा पुढाकार

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. येथे दिलेले धडे आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतात. शाळेतच मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडवतात. याच मुलांना झाडांचे, पर्यावरणाचे महत्त्व कळावे, यासाठी निगवे खालसा येथील दौलत विकास मंडळ संचालित चनिशेटी विद्यालयाने छोट्याशा कृतीतून मोठा पर्यावरणाचा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसादिवशी शाळेकडून भेट स्वरूपात रोप दिले जाते, तर शाळेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागतही रोपानेच केले जाते. ही रोपेही विद्यार्थ्यांनीच मे महिन्यात तयार केलेली असतात. जवळपास दर वर्षी सहाशे रोपे तयार करून त्याची लागवड गावात केली जाते. या उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष आहे.
पावसाची सुरुवात होण्यापूर्वीच शाळेतील विद्यार्थी व शिक्षक विविध देशी वृक्षांच्या बियांपासून रोपनिर्मितीला सुरुवात करतात. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेला हा सिलसिला जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असतो. शाळा सुरू होण्यापूर्वी सुमारे सहाशेच्या आसपास रोपे तयार होतात. शाळेतील परसबागेतच ती ठेवली जातात. सर्वच विद्यार्थी या रोपांची देखभाल करतात. शाळा सुरू झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्याला त्यातील एक रोप भेट स्वरूपात दिले जाते. शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये, पारितोषिक वितरण समारंभात पाहुण्यांचे स्वागत, गुणवंतांचा सत्कारही रोप देऊनच केला जातो.
फक्त रोपे देऊन हा उपक्रम थांबत नाही तर विद्यार्थ्यांना दिलेले रोप कोठे लावले आहे, त्याची देखभाल सुरू आहे का, अशा गोष्टींवर लक्ष ठेवले जाते. याचा परिपाक म्हणून गेल्या नऊ वर्षांत विद्यार्थ्यांना दिलेल्या रोपांमुळे विद्यार्थ्यांचे शिवार, घरासमोरचे अंगण फुलले आहे. एका विद्यार्थ्यांकडे शाळेने दिलेली किमान पाच ते दहा रोपांची लागवड केली आहे. दरम्यान, शाळेच्या मोठ्या परिसरात फुले, फळांची बागही बहरली आहे. त्यासोबत विविध भाज्या पिकणारी एक परसबागही आहे. जेथे कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, मिरची अशा भाज्याही पिकवल्या जातात. येथेही विद्यार्थी श्रमदान करतात. या उपक्रमातून मुलांची मातीशी असलेली नाळ आणखी घट्ट बनत आहे.
------
चौकट
उपक्रमशील शाळा म्हणून लौकिक
विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त गोळ्या, चॉकलेट न वाटता त्यांनी शाळेस पुस्तक भेट देण्याची संकल्पना समोर ठेवली. त्यामाध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्याकडून अतिशय चांगल्या दर्जाची जवळपास २५०० पुस्तके जमा झाली आहेत. दररोज वेगवेगळ्या भाषेमध्ये परिपाठ सादरीकरण, दररोज नवीन संस्कारकथा, वेगवेगळे सहशालेय कार्यक्रम, ग्रंथालयातील जास्त पुस्तके वाचणाऱ्या मुलांना बक्षीस योजनांमुळे चनिशेटी विद्यालय हे उपक्रमशील विद्यालय म्हणून ओळखले जाते. यासाठी संस्थेचे अध्यक्ष शिवराज देसाई, सचिव बी. एस. किल्लेदार, मुख्याध्यापक रवींद्र मोरे यांचे मार्गदर्शन मिळते.
------
कोट
झाडे लावा, झाडे जगवा हे शिक्षण खऱ्या अर्थाने द्यायचे असेल तर फक्त तो पुस्तकांतून नको तर कृतीतून देऊ, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. दरवर्षी सहाशे रोपांची लागवड या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे.
- रवींद्र मोरे, चनिशेटी विद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com