फंडाची स्लीप अडकली ऑनलाईन मध्ये

फंडाची स्लीप अडकली ऑनलाईन मध्ये

फंडाची ‘स्लीप’ अडकली ‘ऑनलाईन’ प्रणालीत
हक्काच्या पैशासाठी हेलपाटे; शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नाराजी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी आता ‘ऑनलाईन स्लीप’ मध्ये अडकला आहे. परिणामी भविष्य निर्वाह निधीतील पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. ‘फंडाची स्लीप’ नसल्यामुळे भविष्य निर्वाह निधी मिळत नाही. या स्लीपनंतर सर्व माहिती ज्या सिस्टीममध्ये भरावी लागते ती ‘बीडीएस’ (बिल डिस्काऊंटींग सिस्टीम) काही दिवस बंद होती. त्यामुळे मार्च-एप्रिलपर्यंत निवृत्त झालेल्या ५५८, तर कार्यरत असलेल्या ३४६ कर्मचाऱ्यांचा ‘ना परतावा’ भविष्य निर्वाह निधी मिळण्याचे काम रखडले. त्याला गती देण्याचे काम आता सुरू आहे.
शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचे बिल प्रत्येक महिन्याला शाळेतील लिपिक तयार करत होता. त्यानंतर वर्षाच्या शेवटी एकूण बारा बिले घेऊन तो हत्तीमहल मार्गावरील भविष्य निर्वाह निधीच्या (पे युनिट) कार्यालयात जात होता. तेथे स्वतःच कार्यालयाच्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद करीत होता. साधारण २०२१-२२ ला ही सर्व पद्धत बंद करण्यात आली आणि ऑनलाईन पद्धतीने ही स्लीप ‘शालार्थ प्रणाली’तून देण्याबाबत सुधारित आदेश देण्यात आले. तेव्हापासून मे २०२४ पर्यंत हे काम अद्यापही सुरू असल्याचे सांगण्यात येते. परिणामी २०२०-२१ नंतर फंडाची स्लीपच तयार झालेली नाही. ज्यावेळी भविष्य निर्वाह निधीचे पैसे काढायचे असतात त्यावेळी या स्लीपची आवश्‍यकता असते. त्याच्या आधारेच पैसे दिले जातात; मात्र ही स्लीप नसल्यामुळे भविष्य निर्वाह निधीचे पैसे काढणे मुश्‍कील झाले आहे.

दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून २०२०-२१ च्या स्‍लीपद्वारे भविष्य निर्वाह निधीतील पैसे देण्याचे काम सुरू केले आहे; मात्र त्यामध्ये पुढील वर्षाचा हिशेब होत नाही. जे २०२०-२४ च्या दरम्यान निवृत्त झाले आहेत त्यांना मागील स्लीपचा आधार घेतला जातो. सर्व माहिती हस्ताक्षरातील प्रस्ताव तयार करून भविष्य निर्वाह निधी कार्यालय (पे युनिट) येथे पाठविला जातो. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीने हा प्रस्ताव पुढे जातो. ‘बीडीएस’द्वारे तो पुढे शासनाकडून ट्रेझरीकडे येतो; मात्र मार्च २०२४ पासून ही सिस्टीम बंद होती. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळू शकले नाहीत.
--------------------
फंडाच्या स्लिप ऑनलाईन तयार करण्याचे काम २०२१ मध्ये सुरू झाले आहे ते अजूनही सुरूच आहे. साधारण राज्यात अशीच स्थिती आहे. अत्यावश्‍यक आहे त्यांच्यासाठी २०२१ च्या स्लीपचा आधार घेतला जातो. मार्च-एप्रिलमध्ये ‘बीडीएस’ प्रणाली बंद असल्यामुळे ‘निवृत्त कर्मचारी’ आणि ‘ना परतावा’ अशी नऊशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित होती. सध्या त्यांपैकी काहींच्या रकमा दोन-चार दिवसांत जमा होतील; मात्र फंडाच्या स्लीप अजूनही ऑनलाईनमध्येच आहेत.
प्रवीण फाटक,
प्रभारी अधीक्षक, भविष्य निर्वाह निधी.
------------------
मुद्दे -
डिसेंबरमध्ये फंडाचे पैसे मागितले. ते अद्याप मिळालेले नाहीत.
काहींची नावेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयात दिसत नाहीत.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही.
अडचणींचा फायदा घेऊन ‘सोयी’चा मार्ग निवडला जातो.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com