इचलकरंजी महापालिका प्रशासन अलर्ट

इचलकरंजी महापालिका प्रशासन अलर्ट

इचलकरंजी महापालिका प्रशासन अलर्ट
खासगी इमारतींवरील होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १५ ः घाटकोपर होर्डिंग प्रकरणानंतर इचलकरंजी महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. शहरातील खासगी इमारतींवर असलेल्या होर्डिंगची सुरक्षितता तपासण्यासाठी संबंधितांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये येत्या १५ दिवसांत होर्डिंगसह संबंधित इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. मुदतीत याबाबतची कार्यवाही न केल्यास परवाना रद्द करण्यासह होर्डिंग जप्त करण्याचा इशारा दिला आहे.
सुदैवाने शहरात सार्वजनिक ठिकाणी एकही जाहिरात होर्डिंग आज अस्तित्वात नाही. त्यामुळे वादळी पावसात होर्डिंग कोसळण्याची भीती खूपच कमी आहे. तत्कालीन नगरपालिका प्रशासन कार्यरत असताना एका ठरावाद्वारे शहरातील होर्डिंग हटवण्यात आले. त्यामुळे होर्डिंग्जमुक्त शहर म्हणून इचलकरंजी शहराची महाराष्ट्रात ओळख आहे. तथापि, प्रशासनाने वाणिज्य जाहिरातीसाठी खासगी इमारतींवर होर्डिंग उभारणीसाठी अटी आणि शर्ती घालून मंजुरी दिली आहे. महापालिकेकडील नोंदीनुसार शहरात तब्बल २२ खासगी होर्डिंग उभे आहेत. बहुतांश १० बाय २० फूट आकाराचे आहेत. त्यापेक्षा मोठ्या आकाराचे म्हणजे ३५ बाय १८ फूट व ३० बाय १५ फुटांचे दोन होर्डिंग आहेत. या होर्डिंग मालकांकडून महापालिका प्रति चौरस फुटाला अडीच रुपये वार्षिक जाहिरात शुल्काची आकारणी करीत आहे.
घाटकोपर प्रकरणानंतर शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना होर्डिंगच्या कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनही अलर्ट झाले आहे. शहरात होर्डिंगची संख्या मर्यादित असली तरी वादळी पावसात कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार खासगी होर्डिंग मालकांना नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये जाहिरात होर्डिंग सुस्थितीत असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून द्यावे लागणार आहे. त्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. ज्या इमारतीवर होर्डिंग उभारले आहे, त्या इमारतीचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागणार आहे. याबाबत मुदतीत कार्यवाही न केल्यास होर्डिंगचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. शिवाय होर्डिंग जप्त केले जाणार आहे.
----------
शहरातील संबंधित होर्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मुदतीत प्रमाणपत्र न दिल्यास होर्डिंग परवान रद्द केला जाणार आहे.
-केतन गुजर, अतिरिक्त आयुक्त, इचलकरंजी महापालिका.
---------
अनधिकृत होर्डिंगचा शोध घेणार
शहरात सार्वजनिक ठिकाणी एकही होर्डिंग नाही. खासगी ठिकाणी होर्डिंग उभारताना परवाना दिला आहे. तथापि, घाटकोपर घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका हद्दीत कोठे अनधिकृत होर्डिंग उभारले आहे काय, याचा प्रशासनाकडून शोध घेतला जाणार आहे.
----------
पेट्रोल पंप, बसस्थानकावरील होर्डिंगबाबत नोटीस देणार
शहरात महापालिकेच्या जागेवर एकही होर्डिंग नाही; मात्र काही पेट्रोल पंप व बसस्थानकात होर्डिंग उभारले आहेत. त्यांना महापालिकेने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही; मात्र त्यांची धोकादायक स्थितीबाबत पाहणी केली जाणार आहे. याबाबत एक पत्र महापालिकेकडून संबंधितांना दिले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
--------------
चार डिजीटल फलक जप्त
शहरात पुन्हा डिजीटल फलकांचे पेव फुटले आहे. याबाबत वाढत्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आज कारवाई सुरु केली. शहरातील विविध भागातून चार डिजीटल फलक जप्त केले. यामध्ये महासत्ता चौक, सांगली रोड, जवाहरनगर परिसरात कारवाई केली. सुभाष आवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. अद्यापही शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात डीजीटल फलक झळकत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com