डेंगी विरोधी दिन

डेंगी विरोधी दिन

डेंगी विरोधी दिन विशेष

खबरदारीच्या उपायांना साथ हवी
डेंगीचा धोका टळलेला नाही; अळ्यांची उत्पत्ती टळावी, लोकसहभाग आवश्‍यक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : डास चावल्याने होणारा डेंगीचा आजार त्यातून होणारा त्रास अद्याप संपलेला नाही, पण डेंगीला फारसे कोण गांभीर्याने घेत नाहीत. परिणामी घराघरांत अडगळीच्या साहित्यात साठलेल्या पाण्यात वाढणाऱ्या डांसाच्या अळ्या डेंगीचे रुग्ण अधून-मधून वाढवत आहेत. आरोग्य कर्मचारी घरोघरी जातात, पण त्यांना आत प्रवेशच दिला जात नाही. यातून खबरदारीचे उपाय पूर्ण क्षमतेने न झाल्याने डासांची उत्पत्ती वाढून डेंगीचा धोका कायम आहे. लोकसहभागाशिवाय डेंगी नियंत्रण अशक्य असल्याने मलेरिया विभाग जनजागृतीवर भर देत आहे.
आरोग्य विभाग लोकहिताच्या अनेक योजना राबवते. त्यासाठी आशा स्वयंसेविका किंवा डेंगी मेलेरिया विभागाचे दूत घरोघरी जातात. योजनाची माहिती देतात. काही ठिकाणी डासांची पैदास होत असल्यास तेथे तपासणी करतात, गरजेनुसार औषध फवारणी करतात. डासांच्या अळ्या नष्ट करण्याचे उपाय सांगतात, मात्र काही ठिकाणी ऐकूण घेणे सोडाच, पण फाटकाच्या आतही घेतले जात नाही. यातून येणाऱ्या अनेक चित्र विचित्र अनुभवांनी आरोग्य कर्मचारी हतबल झाले आहेत.
शहरात उपनगरे वाढली, अपार्टमेंटची संख्या वाढली, घरोघरी साधनसामग्रीचा वापर वाढला आहे. अनेकदा साहित्य खराब झाले की, ते अडगळीत टाकण्याचे प्रमाण वाढते. अशा अडगळीच्या साहित्यात कधीतरी पावसाचे पाणी किंवा घरातील पाणी साठून राहते. त्यातच डासाच्या अळ्या तयार होतात. त्यांचे डास झाले की घराघरांत डास घोंगावतात. यातील विशिष्ट डासांच्या दंशानंतर डेंगीची लागण होते. तीव्र सांधे दुखी, अंगदुखी, ताप, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होतो.
----------------
चौकट
आशांना प्रतिसाद हवा
डेंगीचे धोके टाळण्यासाठी जनजागृती आवश्‍यक आहे. त्यासाठी आशा कर्मचारी घरोघरी जातात. ग्रामीण भागात किमान आशा कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली जाते. मात्र, शहरात काही भागांत आशा कर्मचाऱ्यांना अपार्टमेंटमध्ये प्रवेश दिला जात नाही. सुरक्षारक्षकांकडे नाव नोंदणी करा, त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या, एखादा बंगल्यात गेली की फाटक बंद असते. आत बांधलेला कुत्रा भुंकत असतो. त्या बंगल्यातील एखादी महिला काय पाहिजे नंतर या किंवा आम्हाला माहिती नको, असे सांगत आशा कर्मचाऱ्यांना परतवले जाते. यातून डेंगी डास निर्मूलनाला अडथळा येतो.
----------------
दंड वसुलीची चाचपणी
ठाणे शहरात तेथील आरोग्य विभाग ज्या भागात प्रवेश मिळत नाही किंवा रुग्ण आहेत, अशा भागातील अस्वच्छता व डासांची पैदास होणाऱ्या अडगळीच्या वस्तूची छायाचित्रे घेते. जिथे अस्वच्छतेमुळे डास होतात अशा ठिकाणाच्या मालकांना दंडाची नोटीस पाठविली जाते. त्याच धर्तीवर कोल्हापुरात दंड वसुली करता येईल का, याची चाचपणी आरोग्य विभाग करीत आहे.
---------------
कोट
हिवताप विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असले तरी घरोघरी स्वच्छतेचा सर्व्हे केला जाताो. औषध फवारणी केली जाते. डेंगीचे डास होऊ नयेत यासाठी प्रबोधन केले जाते. त्याला लोकांकडून प्रतिसाद अधिक चांगल्या प्रकारे मिळावा, अशी अपेक्षा आहे. डेंगी प्रसार प्रतिबंधक दिन गुरुवारी (ता.१६) साजरा होत आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डास निर्मूलनासाठी गप्पी मासे सोडण्याचा उपक्रम सीपीआर आवारात होणार आहे.
- जे. के. कांबळे, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com