पोलिस अंमलदार बदल्यांच्या प्रतिक्षेत

पोलिस अंमलदार बदल्यांच्या प्रतिक्षेत

पोलिस अंमलदार बदल्यांच्या प्रतीक्षेत
आचारसंहितेचा अडसर : मुलांच्या शाळा प्रवेशाची लागली चिंता

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : मे महिना म्हणजे पोलिस बदल्यांची प्रक्रिया, मुलांची नवीन ठिकाणी ॲडमिशन, घर बदलण्याची लगबग सुरू असते. मात्र, यंदा लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. प्रशासकीय बदली, विनंती बदलीसाठीचे अर्ज मागवून वीस दिवस उलटले असले तरी लोकसभा निकालानंतरच बदल्या होण्याची शक्यता आहे. पोलिस पालकांना त्याच्या पाल्याच्या शाळा प्रवेशाची चिंता सतावत आहे.
एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्षे कार्यकाल पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्यांसाठी अर्ज मागविण्यात येतात. तसेच कौटुंबिक अडीअडचणी समजून घेऊन काही विनंती बदल्याही यावेळी करण्यात येतात. दरवर्षी मे महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांना त्याच्या बदलीच्या ठिकाणी सोडले जाते. यंदा, मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने बदल्या अद्याप होऊ शकलेल्या नाहीत.
बदलीच्या ठिकाणी हजर होताना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाची चिंताही पोलिस पालकांना सतावत असते. मे महिन्यात झालेल्या बदलीत दुसऱ्या तालुक्यात बदली झाल्यास तेथील शाळेत मुलांचा प्रवेश निश्चित करावा लागतो. तसेच काही पोलिसांनी परजिल्ह्यातही बदली मागितली असेल तर त्या ठिकाणी जाऊन नव्याने घर पाहणे, मुलांचे ॲडमिशन करण्यासाठी वेळ आवश्यक असतो. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होत असल्याने या पालकांचे डोळे बदलीकडे लागून राहिले आहेत.

चौकट
पाच पर्याय मागवले
पोलिसांच्या बदलीपूर्वी त्यांच्याकडून पर्याय मागविण्यात येतात. ही बदली प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी त्यांनी दिलेले पर्याय व संबंधित पोलिस ठाण्याकडे उपलब्ध जागांचा मेळ घातला जातो. गतवर्षी पोलिस अंमलदारांकडे चार पर्याय मागविण्यात आले होते. यंदा यामध्ये अधिक सुटसुटीतपणा येण्यासाठी पाच पर्याय मागविले आहेत.

चौकट
बदली निकालानंतरच
लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदली होऊ शकलेली नाही. जिल्ह्यातील अंदाजे ६०० पोलिस कर्मचारी या प्रतीक्षेत आहेत. निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून, यानंतरच बदली प्रक्रिया राबविण्यात येईल असे वरिष्ठांकडून सांगण्यात आले. शाळा १५ जूननंतर सुरू होणार असल्याने मुलांच्या शाळा प्रवेशासाठी पोलिस पालकांची धावपळ उडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com