४१६९ शेतकऱ्यांचे अनुदान अडकले

४१६९ शेतकऱ्यांचे अनुदान अडकले

४१६९ शेतकऱ्यांचे अनुदान अडकले
ईकेवायसी नसल्याचा परिणाम ः तत्काळ ईकेवायसी पूर्णत्वाचे महसूलचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ः मध्यम दुष्काळी जाहीर केलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना अनुदान मंजूर झाले आहे; परंतु ४ हजार १६९ शेतकऱ्यांचे बॅंकेची ईकेवायसी पूर्ण नसल्याने त्यांचे अनुदान महिन्याहून अधिक काळ पडून राहिले आहे.
गेल्या वर्षी कमी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. गडहिंग्लज तालुक्यात विशेष करून पूर्व भागात पिकांचे उत्पादन हाती लागले नाही. शासनाने केलेल्या पाहणीत हा तालुका मध्यम दुष्काळी म्हणून जाहीर केला. या दुष्काळी भागात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचा महसूल, पंचायत समिती व कृषी विभागातर्फे पंचनामा केला होता.
दरम्यान, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली. पंचनामे केलेले आणि नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली होती. पहिल्या टप्प्यात ११ हजार १७७ पैकी १०९२१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४ कोटी १ लाख १४ हजाराचे अनुदान मंजूर झाले आहे. ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केलेल्या यादीतील पात्र १० हजार ९२१ पैकी ५९८५ शेतकऱ्यांनी बॅंक खात्याशी ईकेवायसी पूर्ण केली आहे. त्यांची भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली आहे; परंतु ४ हजार १६९ शेतकऱ्यांची ईकेवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाकडे दिल्या आहेत. महसूल विभागातर्फे वारंवार आवाहन करूनही अद्यापी शेतकऱ्यांनी ईकेवायसी पूर्ण न केल्याने त्यांच्या भरपाईची रक्कम अडकली आहे.
------------
ईकेवायसी नाही, तर भरपाई नाही
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होणार आहे. यामुळे ईकेवायसी महत्त्वाची आहे. ती नसेल तर मदतीची रक्कम मिळणे कठीण होणार आहे. यामुळे ४ हजार १६९ शेतकऱ्यांनी तत्काळ ईकेवायसी करावी. बॅंक पासबुक व आधार कार्ड घेऊन जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी संबंधित खातेदारांना केले आहे. खातेदारांना काही अडचणी असल्यास संबंधित गावच्या तलाठ्यांशी संपर्क साधावा, असेही कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com