चाकावरचं जगणं भाग - २

चाकावरचं जगणं भाग - २
Published on

चाकावरचं जगणं : भाग - २ ( लोगो कालच्या टुडे १ मेनमधून)

आर्थिक गणित बिघडल्याने चिंतेचे ढग

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : ऊस वाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध होत नसल्याने साखर कारखानदारांनी सभासद शेतकऱ्यांना ट्रक दिले. सहा महिने ऊस वाहतुकीचे काम करून शेतकरी अन्य मालांच्या वाहतुकीचे काम करू लागले. पर्यायाने त्यांच्या राहणीमानाचा दर्जा बदलत गेला. ट्रक व्यावसायिक व चालकांच्या व्यवसायावर मात्र त्याचा परिणाम होऊ लागला. महिन्याकाठी पैशाने फुगणारा खिसा मात्र रिकामा होऊ लागला. सात, दहा, चौदा, सोळा टायरचे ट्रक रस्त्यावर धावू लागल्यानंतर आर्थिक गणित बिघडू लागल्याने व्यावसायिकांसमोर चिंतेचे ढग जमा झाले.
साधारणपणे १९६७-६८ ला दहा टन पासिंगचे रॉकेट, बारादा मर्सिडीज, अशोक लेलँडचे ट्रक माल वाहतुकीसाठी खरेदी केले जाऊ लागले. कोल्हापूर ते अहमदाबाद फेरीसाठी ३४०० ते ३६०० रुपये भाडे मिळत होते. एकेरी रोड असूनही महिन्यात चार ते पाच फेऱ्या करणारे चालक होते. सोळा टन क्षमतेच्या ट्रकमुळे माल वाहतूक क्षमता वाढली. त्याचा परिणाम म्हणून डिझेलचा खर्च वाढला आणि सहा टायरच्या गाड्यांचे मार्केट कमी झाले. विशेष म्हणजे १९७५-७६ ला पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या सुशिक्षित बेकार कर्ज योजनेद्वारे ट्रक खरेदी करणाऱ्यांचा आकडा अधिक होता. बँकेकडून कर्ज मंजूर होण्यात कोणतीच अडचणही त्यांना होत नव्हती. पुढे एकवीस टन क्षमतेच्या ट्रकमुळे वाहतुकीचे भाडे कमी झाल्याने कर्ज काढून ट्रक घेणाऱ्यांना व्यवसायातील भीती गडद झाली.
विशेष असे की, २००५ पर्यंत जिल्ह्यात चालकांची संख्या दहा हजारांवर पोहोचली. चालकाला महिन्याकाठी तीन हजार रुपये दिले जात होते. अन्य जिल्ह्यातील, राज्यातील फेरीसाठी भत्त्यापोटी फेरीमागे दोनशे रुपये देण्यात येत होते. क्लिनरला हजार ते बाराशे रुपयांपर्यंत मिळत होते. नामांकित ट्रक मालकांकडे क्लिनर म्हणून काम मिळाले तरी तो स्वीकारले जात होते. क्लिनरचा चालक होण्याचे अनेकांचे स्वप्न होते. एखादा ट्रक घेऊन मालक अनेक जण झालेही. गूळ, कांदा, बटाटा, लसूण, खत, धान्य, कडधान्याची वाहतूक करण्याचे कामही त्यांनी केले.
---------------
चौकट
वसंतराव नाईकांकडून असोसिएशनची स्थापना
शिवशक्ती ट्रान्स्पोर्टचे वसंतराव नाईक कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे संस्थापक. त्यांनी ३० मे १९८१ला असोसिएशनची स्थापना केली. राज्याच्या ट्रक, बस, टेंपोधारकांच्या असोसिएशनचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. व्यवसायातील कामाचा त्यांना मोठा अनुभव होता. तसेच असोसिएशनच्या कामकाजातील पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती.

चौकट
रत्नाप्पा कुंभार, कलिकते, बोंद्रे यांचा फॉर्म्युला
रत्नाप्पा कुंभार यांनी १९६७ ला पंचगंगा वाहतूक संस्था स्थापन करत ५० ट्रक शेतकऱ्यांना दिले. गोविंदराव कलिकते यांनी बिद्री कारखान्यात तोच फॉर्म्युला वापरला. श्रीपतराव बोंद्रे यांनी शेतकऱ्यांत ट्रक देत महात्मा जोतिबा फुले वाहतूक संघटनेची स्थापना केली, असे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com