हवा करवीरची… ०३ जुलै

हवा करवीरची… ०३ जुलै

लोगो ः हवा करवीरची

काही नेम नाही, ही पाण्यातही लावतील लाईट
पंचगंगा नदी घाट परिसरात विद्युत रोषणाई केली जात आहे. त्याच्या गुणवत्तेवरून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. नेहमी घाटाच्या परिसरात फिरायला येणाऱ्या सामान्यांना त्याबाबत वेगळे वाटत नव्हते; पण सायंकाळी घाटावरील कट्ट्यावर बसल्यानंतर पेपरात वेगवेगळे छापून येत असल्याचे समजल्यानंतर तिथे रंगलेली चर्चा भलतीच तापली. एका ज्येष्ठाने तर लाईट लावल्या जात असल्याचे कौतुक केले. पैसे आले म्हणून कुठे काय लावावे, याचा विचार करायलाच पाहिजे. नाही तर आहेत पैसे म्हणून काही दिवसांनी ही माणसं नदीच्या पाण्यातही लाईट लावतील असा टोला लावल्यानंतर, इतरांनीही हे मात्र खरं आहे, असे सांगत यंत्रणेचा काही नेम नाही असाच सूर आळवला.
------
अरे, पाळणा हालवायचा कुणी ..
मतदान झाले तरीही निवडणुकीचा फिव्हर वाढतच आहे. चार दिवसांपूर्वी ‘दक्षिणे’तील एका वाडीत लहान मुलाचा नामकरण सोहळा झाला. सर्व पाहुणे जमले होते. पाळणा म्हणणारी आजीबाई पाळणा म्हणण्याच्या तयारीत असताना बाहेरच्या साउंड सिस्टीमवर ‘येऊन - येऊन ऐणार कोण’ असे शब्द ऐकू येताच. सर्वजण आश्चर्याने बाहेर आले. पाळण्याजवळ कोणीच नव्हतं. इतक्यात एक आजोबा ओरडले. ‘अरे ते बाळ रडतंय, आता हा पाळणा हालवायचा कुणी’, आजोबाचे हे करडे शब्द मात्र सर्वांनाच हसवून गेले.
-------
नेते परवडले, त्यांचे पीए नकोत
पुण्यात आलिशान मोटारीने दोघांचा जीव घेतल्यानंतर कोल्हापूरच्या वाहतूक शाखेनेही कारवाईचा बडगा उगारला. अल्पवयीन चालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतूक पोलिस चौकाचौकात वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. अशात एक - दोन अल्पवयीन चालकांची कारवाईतून मुक्तता करण्यासाठी फोन आले. पुण्यातील अपघातात अनेक नेत्यांची नावे उघड होत असताना कोल्हापुरातील नेत्यांच्या पी. ए.कडून असे फोन आल्याने पोलिस वैतागले आहेत. ‘नेते परवडले, खरं पीए नकोत’ अशी प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांमधून उमटत आहे.
---------
भुईमूग नव्हं, केंदाळ हाय...
कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्याची आणि इथल्या शेतीची परजिल्ह्यातून येथे येणाऱ्या पर्यटक, भाविकांना भुरळ पडते. असेच काही भाविक कोल्हापूर-परभणी एसटीतून गेल्या चार दिवसांपूर्वी जात होते. ही एसटी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीच्या पुलावरून जाताना त्यातील एका महिला भाविकाने खिडकीतून बाहेर बघत ‘अरे वा किती छान भुईमुगाची शेती आहे’ असा उल्लेख मोठ्याने केला. त्यावर कोल्हापूरच्या एका व्यक्तीने ‘आहो ती भुईमुगाची शेती नव्हं, नदीच्या पाण्यातील केंदाळ हाय’ असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हास्य फुलले. असा हा गंमतीदार किस्सा घडला असला, तरी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर बनत चालला आहे. ते दाखविणाराही आहे.
-----
मी क्लार्क नाय
एका भल्या मोठ्या मैदानात एका खेळासंबंधी जम्बो स्वरूपात सामने सुरू आहेत. या सामन्यांसाठी स्पर्धा समन्वयक, पंच अशी मंडळीही कार्यरत आहे. सर्व मंडळींना कागदोपत्रांकरिता क्लार्कची मदत घ्यावी लागते. क्लार्क म्हणजे ही संस्थानिकच, अशीच स्थिती या संस्थेची झाली आहे. चार दिवसांपूर्वी दिवसभरात चौदा सामने झाले. त्यांचा निकाल प्रसारमाध्यमांसह इतरांनाही द्यावा लागतो. ही बाब नित्याचीच असते. तरीही हा निकाल वेळेत काही मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी चौकशी केल्यानंतर क्लार्क सुटीवर होता. मग, त्याने उपस्थित शिपायाला तुला हा निकाल द्यायला काय झाले होते, अशी विचारणा केली. त्यावर शिपायाने शांतपणे उत्तर दिले. ‘इतरवेळी मी असा निकाल दिला की, तुम्ही म्हणता तू काय क्लार्क हायस का? ‘मी क्लार्क नाय’ म्हणून निकाल दिला नाही’ असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तराने उपस्थित सर्वच आवाक झाले.
----------
जरा आवरतं घेतलं असतं तर…
एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे भाषण उपस्थितांना ऐकायचे असते. त्यासाठी कार्यक्रमात वेळ झाला तरीही नागरिक बसून पाहुण्याच्या मार्गदर्शनाची वाट पाहतात; पण अशा वेळी निवेदकालाच चेव चढतो अन् तेचं लांबलचक भाषण ठोसतात. त्यामुळे कंटाळलेल्या श्रोत्यापुढे वेळेचे भान ठेवत प्रमुख पाहुण्यालाही आवरतं घ्यावं लागतं. असाच किस्सा घडला तो विद्यापीठातील मानव्यशास्त्र विभागात. वेळ दुपारी चारची. निवेदिकेने पाचच मिनिटांत कार्यक्रम सुरू होतोय, असं तीन-चार वेळेला सांगितलं. अखेर सव्वा पाच वाजता कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. पाहुण्यांचे भाषण लगेचच सुरू होईल, अशी उपस्थितांची अटकळ. ती वेळ मात्र येईना. उपस्थितांतले काहीजण खुर्ची सोडून जाऊ लागले. भावनिक कार्यक्रम असल्याने निवेदिकेने सूत्रसंचालन पुन्हा लांबवले. पुढे प्रमुख पाहुण्यांचे भाषण होऊन आभार मानायला रात्रीचे साडेआठ वाजले अन् निवेदिकेने जरा आवरतं घेतलं असतं तर, अशी चर्चा सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com