घरच्या बियाणांतूनही फुटणार अंकूर

घरच्या बियाणांतूनही फुटणार अंकूर

घरच्या बियाणांतूनही फुटणार अंकुर
गडहिंग्लज तालुका ः घरातील ८०० टन सोयाबीन, भात बियाणांचा होणार वापर
अजित माद्याळे ः सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ ः ‘जुनं ते सोनं’ या म्हणीची प्रचिती शेती व्यवसायातही येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारात शेकडो जातींची बियाणे दाखल झाली असली तरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी घरच्या बियाण्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे. यंदा सोयाबीन व भाताचे ८०० टन बियाणे घरातीलच वापरण्यात येणार असून या घरच्या बियाणातून आता नवे अंकुर फुटणार आहेत.
खरीप हंगामाचे वेध लागताच शेतकऱ्यांमध्ये शेती मशागत पूर्ण करण्यासह बियाणे, खते, औषधे उपलब्ध करण्यात धडपड पहायला मिळते. तालुक्यात खरिपामध्ये भात, सोयाबीन पिके प्राधान्याने, तर भुईमूग, ज्वारी, मका, नाचणीसह कडधान्ये व तृणधान्ये कमी प्रमाणात घेतली जातात. सोयाबीन १२ हजार २००, तर भाताची ८ हजार ८९० हेक्टरमध्ये यंदा लागवड होणार आहे. शेकडो कंपन्यांची बियाणे सध्या बाजारात उपलब्ध असून खरेदीसाठी गर्दीही होत आहे. खतांचा साठाही मुबलक प्रमाणात आहे. अलीकडील काही वर्षांपासून सोयाबीन व भात बियाणांची दरवाढ होत आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. यावर्षी दहा टक्क्यांनी दर वाढल्याचे सांगण्यात येते.
या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागातर्फे सोयाबीन व भाताचे बियाणे घरातील वापरण्याचे आवाहन केले जाते. सोयाबीन बियाणे सलग दोन वर्षे वापरले तरी चांगले उत्पादन मिळवून देते. बियाणांची झालेली दरवाढ व कृषी खात्याने केलेल्या प्रबोधनानुसार अलीकडील काही वर्षांपासून शेतकरी घरचे सोयाबीन पेरणीसाठी वापरण्यास प्राधान्य देत आहे. यंदा हे प्रमाण सोयाबीनमध्ये ७५, तर भातामध्ये ४० टक्क्यांवर पोहचले आहे. सोयाबीन हेक्टरी ७०, तर भात बियाणे ४५ किलो लागतात. यावर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याचे प्रमाण ७५ टक्के, तर भाताचे ४० टक्क्यापर्यंत आहे. यामुळे बाजारात विक्रीसाठी सोयाबीनचे २ हजार २३ क्विंटल, तर भात २ हजार २२ क्विंटल बियाणे विक्रीसाठी मागणी केली असून बियाणांचा साठा मुबलक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
-------------
दृष्टिक्षेपात घरगुती बियाणे
- सोयाबीन लागवड ः १२ हजार २०० हेक्टर
* घरगुती बियाणांचा वापर ः ६४० टन (एकूण बियाणांच्या ७५ टक्के)
------------------------------------
- भाताची लागवड ः ८ हजार ८९० हेक्टर
* घरगुती बियाणे ः १६० टन (एकूण बियाणांच्या ४० टक्के)
----------------------------------------
उगवण क्षमता तपासावी
शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता आधी तपासावी. ओल्या सुतळी गोणपाटात हे बियाणे घालून त्याची गुंडाळी करावी. काही दिवसांनंतर त्यातील ७० टक्के बियाणे उगवले असले, तरच एकरी ३० किलोप्रमाणे त्याचा वापर करावा. ६० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असलेली बियाणांची पेरणी करू नये. भात बियाणे वापरताना १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ टाकून त्याच्या आळवणीत भात बियाणे टाकावे. तरंगणारे बियाणे बाजूला करावेत. तळातील बियाणे स्वच्छ पाण्यात धुऊन सावलीत सुकवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची पेरणी करावी. यामुळे भातावरील करपा, कडाकरपा, काजळी रोग नियंत्रणात राहण्यास मदत होते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे व कृषी सहायक अनिल कांबळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com