राजकीय बातमी

राजकीय बातमी

एक्झिट पोलमुळे उत्सुकता शिगेला
लोकसभा निकालावर ठरणार जिल्ह्याचे राजकीय समीकरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निकालाला अवघ्या तीन दिवसांचा अवधी राहिल्याने कोल्हापुरातून विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक की श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तर हातकणंगलेतून विद्यमान खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी की माजी आमदार सत्यजित पाटील विजयी होणार, याविषयीची उत्सुकता ताणली आहे.
लोकसभेच्या निकालावर जिल्ह्याचे आगामी राजकीय समीकरण निश्‍चित होणार असल्याने या निवडणुकीच्या निकालावर राजकीय क्षेत्रात पैजा लागल्या आहेत. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर विधानसभेला चांगलीच रंगत येणार असून, अनेकांचे राजकीय भवितव्यही ही निवडणूक ठरवणार आहे.
कोल्हापुरात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासमोर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे मोठे आव्हान आहे. चौरंगी लढत होत असलेल्या हातकणंगलेत ‘वंचित’चे डी. सी. पाटील किती मते घेणार यावर महाविकाससह महायुती व शेट्टी यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. हातकणंगलेत विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांचे मोठे आव्हान आहे.
दोन्हीही मतदारसंघांत सात मेनंतर दोन दिवस कोण विजयी होणार, याची चर्चा चांगलीच रंगली. त्यानंतर उमेदवार, त्यांचे समर्थक शांत होते. आता निकालाची तारीख जशी जवळ येईल तशी उमेदवारांसह त्यांच्या मागे ताकद लावलेले नेते, कार्यकर्ते यांची धाकधूक वाढली आहे. पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघ झालेल्या मतदानाची आकडेवारी घेऊन विजयाचा ठोकताळा बांधला जात आहे. आपलाच उमेदवार कसा विजयी होणार याचे आराखडे या आकडेवारीवरून सांगितले जात आहेत. त्यात किती तथ्य आहे, याचा फैसला मंगळवारी (ता. ४) होईलच. दोन्ही मतदारसंघांतील विजयावर अनेकांच्या पैजा तर लागल्या आहेतच, पण सट्टाबाजारातही कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे समजते.
...
मतमोजणी केंद्रावर ‘वॉच’
सात मे रोजी मतदान झाल्यापासून उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी मतमोजणी केंद्राबाहेर २४ तास राबता ठेवला आहे. त्यासाठी काही कार्यकर्त्यांची नियुक्ती केली असून, दर चार तासांनी हे कार्यकर्ते बदलले जातात. याशिवाय दर दोन दिवसांनी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमची तपासणी केली जाते. काल (ता. ३१) या केंद्राद्वारे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सीडी प्रतिनिधींच्या उपस्थितीत बदलण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com