फुटबॉलस्टार सुनील छेत्री अन् कोल्हापूरकर

फुटबॉलस्टार सुनील छेत्री अन् कोल्हापूरकर

87444
87440

फुटबॉलस्टार सुनील छेत्री अन् कोल्हापूरकर
दहा दिवसांचा मुक्काम ठरला संस्मरणीय; आयलीगचे तीन सामने खेळले; सहा जूनला होणार निवृत्त ः मंडळाच्या उदघाटनासह जीम, जलतरणाचा आनंदही लुटला
---------
सकाळ वृत्तसेवा ः सचिन भोसले

कोल्हापूर, ता. २ ः ‘फिफा’च्या जागतिक गोल क्रमवारीसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणाऱ्या पोतृगालचा ख्रिस्तीनो रोनॉल्डो, अर्जेटिनाचा लियोनल मेस्सीखालोखाल ज्याचा नंबर लागतो असा भारतीय संघाचा फुटबॉलस्टार कर्णधार सुनील छेत्रीचा कोल्हापूरशी काही सबंध असेल, असे कोणालाही पटणार नाही. मात्र, तेरा वर्षांपूर्वी आयलीग फुटबॉल स्पर्धेनिमित्त दहा दिवसांचा मुक्काम केला होता. या त्यांच्या मुक्कामातील आठवणींनी उजाळा मिळत आहे. हा तारा बुधवारी (ता. ६) बंगळूरमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध कुवेत यांच्यातील विश्‍वचषक पात्रता फेरीतील सामन्यानंतर फुटबॉलमधून निवृत्त होत आहे. यानिमित्त...

सुनील छेत्री म्हटले की भारतीय फुटबॉलला जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळवून देणारा हुकमी एक्का होय. त्याचा कोल्हापूरशी संपर्क मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने ३ डिसेंबर २०१० ते ३० मे २०११ या कालावधीत आयलींग सामन्यानिमित्त आला. हा योग स्पर्धेदरम्यान मुंबईतील कुपरेज मैदान नूतनीकरणासाठी काढले होते. त्यात घरचे मैदान म्हणून एअर इंडिया, मुंबई एफसी, ओएनजीसी या संघांनी छत्रपती शाहू स्टेडियमला पसंती दिली होती. त्यात कोलकत्याच्या चिराग युनायटेड या संघाकडून सुनील छेत्री सामने खेळण्यासाठी कोल्हापुरात २५ फेब्रुवारी २०११ ला दाखल झाला. त्याने एक दिवस सराव केला. त्यानंतर २७ फेब्रुवारीला एअर इंडिया विरुद्ध सामना खेळला. त्यानंतर २८ फेब्रुवारीला तो दिल्लीला परतला. त्यानंतर २३ एप्रिल २०११ ला पुन्हा कोल्हापुरात आला. त्याने एक दिवस सराव केला. त्यानंतर २५ एप्रिलला मुंबई एफसी विरूद्ध सामना खेळला. त्यानंतर तीन दिवस कोल्हापुरात सराव केला. त्यानंतर त्याने २९ एप्रिलला ओएनजीसी संघाविरूद्ध सामना खेळला. हा त्याच्या मुक्कामाचा दहा दिवसांचा संस्मरणीय कालावधी ठरला. त्याने या दहा दिवसांच्या मुक्कामात छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जलतरण तलावात पोहण्याचा आनंद घेतला. एका जिममध्ये व्यायामाचा सराव केला. कोल्हापुरी जेवणावरही ताव मारला. या त्याच्या आठवणींना कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात तो विश्‍व फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्यामुळे पुन्हा उजाळा मिळाला.
------
असा आला संपर्क
सुनील छेत्रीच्या चिराग युनायटेड संघाची पुणे ते कोल्हापूर अशी आलिशान बसमधून ने-आण करण्याची जबाबदारी फुटबॉलपटू विकास पाटील, अतुल साळोखे यांच्यावर मालोजीराजे यांनी सोपविली होती. यादरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील जलतरण तलावात पोहण्याचा आनंदही लुटला. त्यातच प्रदीप साळोखे, राजू राऊत, राजू साळोखे यांच्या आग्रहास्तव नेताजी तरुण मंडळाचे उद्‌घाटनही केले. या दरम्यानच बालसंकुलमधील मुलांना दहा फुटबॉलही त्याने वाटले. २०१८ मध्ये कोल्हापूरचा आयटी अभियंता फुटबॉलवेडा धैर्यशील पाटीलने लाकडावर कोरीव काम केलेली कलाकृती भेट म्हणून दिली. त्याचीही भेट सुनीलच्या दिल्लीतील घरातील दिवाणखान्यात दिमाखात लावली आहे. याशिवाय त्याच्या वाढदिवसानिमित्त गतवर्षी कोल्हापुरातील तीन चौकांत शुभेच्छांचे फलकही लावले होते.
-------
कोट
आयलीग सामन्यांनिमित्त सुनील छेत्रीने फुटबॉलपंढरी छत्रपती शाहू स्टेडियमवर सामने खेळले. ही आपल्या कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फिफा विश्‍वचषक पात्रता फेरीच्या सामन्यानंतर तो विश्‍व फुटबॉलमधून निवृत्त होत आहे. त्याला खुप शुभेच्छा.
- मालोजीराजे छत्रपती, सदस्य, एआयएफएफ, उपाध्यक्ष विफा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com