आरटीओ’कडून स्कूल बस तपासणी मोहीम सुरू

आरटीओ’कडून स्कूल बस तपासणी मोहीम सुरू

‘आरटीओ’कडून स्कूल बस तपासणी सुरू
विना तपासणी वाहतूक केल्यास दिवसाला पन्नास रुपये दंड; वैध बसेसना फिटनेस प्रमाणपत्र
.........
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः यंदाचे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरू केली आहे. यात वैध ठरलेल्या बसेसना फिटनेस प्रमाणपत्र दिले जात आहे. दरवर्षीप्रमाणे जे स्कूल बसमालक किंवा संस्था बसेसची तपासणी करून घेणार नाहीत. अशांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
आपल्या पाल्याचा शाळेपर्यंतची ने-आण सुरक्षितता हा पालकांच्या चिंतेचा विषय असतो. त्याकरिता योग्य बसेसची निवड करणे महत्त्वाची बाब असते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शाळा सुरू होण्यापूर्वी अशी मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचे दरवाजे, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, तत्काळ बाहेर पडण्याचा मार्ग, खिडकीला आवश्‍यक असणारे दोन लोखंडी रॉड, ब्रेक लाईट, हेडलाईट, रिफ्लेक्टर, टायरची स्थिती, वेग नियंत्रक (स्पीड गर्व्हनर), ब्रेकची चाचणी, इंजिन चाचणी, विमा, अशा २५ प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. जिल्ह्यात ७५० हून अधिक स्कूल बसेसची नोंदणी आहे. त्यातून रोज हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करतात. त्यामुळे या तपासणीला महत्त्व आहे. काही बसेस विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करतात. त्यात बसच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्याची ने-आण करून त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल, असे कृत्य करतात. ही बाब अनेकदा वर्षानुवर्षे उघडही होत नाही. यात कदाचित संबंधित बसचा अपघात झाल्यानंतर विमा, सुरक्षितता आदी बाबींचा प्रश्‍न पुढे येतो. हा प्रश्‍न निर्माण होऊ नये, विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, या उद्देशाने अशा बसेसची तपासणी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी केली जात आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक बसेसची तपासणी पूर्ण झाली आहे. जे बसचालक, मालक, संस्था आपल्या बसेस वेळेत तपासणी करून घेणार नाहीत. अशा बसेसवर रोज पन्नास रुपये याप्रमाणे दंड आकारणी केली जाणार आहे. याशिवाय गंभीर बाब असेल तर कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे.
..........
कोट
शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल बसमालक, संस्थांनी आपल्या स्कूल बसेसची तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. विना तपासणी वाहनांचा वापर विद्यार्थी वाहतुकीसाठी केल्यास रोज पन्नास रुपये दंडासह कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यामुळे ज्यांनी आपल्या बसेसची तपासणी केलेली नाही. त्यांनी ती पूर्ण करून घ्यावी.
- रोहित काटकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com