पगारासाठी आंदोलनच करायचं काय?

पगारासाठी आंदोलनच करायचं काय?

gad32.jpg
87525
गडहिंग्लज ः थकीत पगार व प्राव्हिडंट फंडप्रश्नी झाडू कामगारांनी पालिकेच्या दारात निदर्शने केली. यावेळी संतोष चिक्कोडे, महेश सलवादे, रवी पाटील आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------------
पगारासाठी आंदोलनच करायचं काय?
कामगारांचा सवाल ः गडहिंग्लज पालिकेसमोर पगारासाठी पुन्हा निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः पालिकेकडे ठेक्यावर असलेले झाडू, कंपोस्ट, बांधकाम, घंटागाडी, गटर-गवत सफाई व उद्यानातील कामगारांनी आज पगारासाठी पुन्हा निदर्शने केली. आंदोलन केल्यानंतरच पगार मिळणार काय, असा संतप्त सवाल कामगारांनी प्रशासनाला विचारला.
त्यानंतर थकीत पगार व इतर मागण्यांसाठी आज पुन्हा ठेक्यावरील कामगारांनी महेश सलवादे, संतोष चिक्कोडे, संतोष कांबळे, रवी पाटील, संदीप कुराडे, अमोल गाताडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलकांच्या मागणीवरून आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे यांनी थकीत पगार व प्राव्हिडंट फंड भरल्याशिवाय संबंधित ठेकेदाराची बिले काढणार नाही, अशी हमी दिली. अधीक्षक श्‍वेता सुर्वे व शिवणे यांना निवेदन दिले. कार्यालयासमोर प्रशासन व ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बहुतांश कामगार तीस वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. दहा वर्षांपासून १५० रुपये पगारावरच काम करतात. अनेक आंदोलने केल्यानंतर आता १० ते २० रुपयांची वाढ मिळाली आहे. प्राव्हिडंट फंडाची रक्कम पगारातून कपात करून घेतली जाते; परंतु ती कामगारांच्या खात्यावर जमा केली जात नाही. त्यामुळे कामगारांचे आर्थिक शोषण व नुकसान होत आहे. कामगार कायद्याचे कंत्राटदाराकडून उल्लंघन होत आहे. यासाठी कामगारांचे पगार खात्यावर जमा करावेत. संबंधित ठेकेदाराची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी सर्व कामगारांचे पगार, प्राव्हिडंट फंडाची रक्कम वसूल केल्याशिवाय ठेकेदाराची बिले काढू नयेत, अशी मागणी केली.
सलवादे व चिक्कोडे यांनी कामगारांचे प्राव्हिडंट फंड त्यांच्या खात्यावर वर्ग न होता दुसऱ्यांच्या नावाने जमा होत असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर शिवणे यांनी कामगारांच्या कामाचे आठ तास भरत नसल्याने फंडाबाबत तांत्रिक अडचणी येत असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने येत्या शनिवारी (ता. ८) पहिला आणि नंतर आठ दिवसांनी दुसरा थकीत पगार देण्याची ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी व कामगार आयुक्तांनाही दिल्या आहेत. निवेदनावर अशोक मुगळीकर, नितीन लाखे, परशराम भोगण, नामदेव बारामती, गणपती गुंठे आदी कामगारांच्या सह्या आहेत.
-----------------------
स्वच्छतेचे काम झाले ठप्प
दरम्यान, दोन महिन्यांचा थकीत पगार व प्राव्हिडंट फंडाच्या रक्कमप्रश्नी कामगारांनी आज (ता. ३) स्वच्छतेचे काम बंद केले होते. आज झाडलोट न झाल्याने कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ठेकेदाराने प्राव्हिडंट फंडाच्या रकमेचा हिशोब तत्काळ द्यावा अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा कामगारांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com