‘हयाती’च्या दाखल्यासाठी मरणयातना

‘हयाती’च्या दाखल्यासाठी मरणयातना

gad34.jpg
87527
गडहिंग्लज ः पालिका शाहू सभागृहाच्या २१ पायऱ्यांचे दिव्य पार करून हयातीचा दाखला मिळविण्यासाठी गर्दी झाली होती. दुसऱ्या छायाचित्रात पायऱ्या चढून दमलेली वृद्धा सभागृहात जमिनीवरच ठाण मांडली.
-----------------------------------------------------
‘हयाती’च्या दाखल्यासाठी मरणयातना
गडहिंग्लज पालिका ः वृद्धांना चढाव्या लागल्या २१ पायऱ्या
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ ः संजय गांधी योजनेतंर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी (पेन्शन) लाभार्थींना हयातीचा दाखला सादर करण्याची सूचना दिली आहे. शहरातील लाभार्थींचा दाखला पालिकेकडून दिले जात आहे. परंतु, ही प्रक्रिया पहिल्या मजल्यावरील शाहू सभागृहातून राबवत असल्याने वृद्ध लाभार्थ्यांना २१ पायऱ्या चढाव्या लागल्याने त्यांना मरणयातनाच आठवल्या.
महसूल खात्यातर्फे संजय गांधी योजनेतील लाभार्थींना अनुदान दिले जाते. दरमहा पेन्शन स्वरूपात ठराविक रक्कम त्यांना दिली जाते. तालुक्यात ११ हजारांवर लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. हे अनुदान कायम सुरू ठेवण्यासाठी लाभार्थींना सहा महिने किंवा वर्षातून एकदा हयातीचा दाखला सादर करण्याची सूचना दिली जाते. दरम्यान, शहरातील लाभार्थींचे हयातीचे दाखले पालिकेतर्फे दिली जातात. हे दाखले नेऊन पुन्हा तलाठ्यांकडे सोपवावे लागतात. तीन-चार दिवसांपासून हे दाखले देण्याची प्रक्रिया पालिकेत सुरू आहे. सुरूवातीला खालच्या कार्यालयातील नगराध्यक्ष कक्षातूनच हे दाखले दिले गेले. परंतु आज (ता. ३) अचानक पहिल्या मजल्यावरील शाहू सभागृहात हे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली.
मुळात श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी हे ६५ वर्षांवरील असतात. शिवाय विधवा, अपंग लाभार्थ्यांनाही दाखले सादर करण्याची सूचना आहे. या लाभार्थ्यांना आज शाहू सभागृहापर्यंत पोहोचण्यासाठी २१ पायऱ्यांचे दिव्य पार पाडावे लागले. दुपारी बारापर्यंत अनेक वृद्ध धापा टाकत कसे-बसे शाहू सभागृह गाठत होते. एका महिलेचे तर काही महिन्यापूर्वीच बायपास शस्त्रक्रिया झाली होती. तिला पायऱ्या चढताना दम भरत होता. दोन ते तीन वेळा तिला खाली बसावे लागले. एका वृद्धेला पहिली पायरीसुद्धा चढता येत नव्हती. पालिकेच्या आजच्या या नियोजनाबद्दल लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत होती.
------------
अखेर सुटकेचा निश्वास सोडला
ही कसरत चालू असताना झाडू कामगारांच्या आंदोलनासाठी आलेले महेश सलवादे, संतोष चिकोडे यांच्यासह शीतल माणगावे, सुरेश कांबळे यांनी प्रशासनाला या प्रश्नावर धारेवर धरले. काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या तालुक्यात हयातीचा दाखला नेण्यासाठी आलेल्या एका वृद्धेने जीव गमावला आहे. या पार्श्‍वभूमीवर वृद्ध लाभार्थींना प्रशासनाने पायऱ्या चढायला कसे काय लावले, असा प्रश्न विचारून ही प्रक्रिया नेहमीप्रमाणे खालच्या कार्यालयातील नगराध्यक्ष कक्षातूनच सुरू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. यामुळे वृद्ध लाभार्थींनी सुटकेचा निश्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com