Kolhapur Jail Murder
Kolhapur Jail Murderesakal

Kolhapur Jail Murder: कैद्याच्या मृतदेहाचे ‘इन कॅमेरा’ शवविच्‍छेदन, केरळहून आलेल्या पत्नीने घेतला मृतदेह ताब्यात

दरम्यान, ज्यांनी हल्ला करून खान याचा खून केला, त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी ताबा मिळविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः कळंबा मध्यवर्ती कारागृहात काल खून झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील कैद्याच्या मृतदेहाचे आज सीपीआरमध्ये ‘इन कॅमेरा’ शवविच्‍छेदन झाले. यानंतर केरळहून रुग्णवाहिका आणि नातेवाईकांसह आलेल्या त्याच्या पत्नीने त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. घडलेल्या घटनेचे गांभीर्य पाहून हल्लेखोर कैद्यांना अंडासेलमध्ये ठेवण्यात आले असून, इतर चौघांची व्यवस्था अतिसुरक्षा विभागात केली आहे. जुना राजवाडा पोलिसांकडून त्यांचा ताबा घेण्यासाठीचे कागदोपत्री प्रयत्न सुरू झाले आहेत.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात काल सकाळी मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी मुन्ना खान याच्यावर हल्ला झाला. सांगली जिल्ह्यातील कैद्यांनी हा हल्ला केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. खून कारागृहात झाल्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पंचनामा झाला. त्यानंतर तो मृतदेह सीपीआर शवगृहात ठेवला होता. त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली होती. त्यानुसार आज सकाळी केरळहून त्याची पत्नी रसिया (कन्नूर, केरळ) आली. यावेळी ती येताना सोबत रुग्णवाहिका घेऊन आली होती. तिच्यासोबत तिचे नातेवाईक सुद्धा होते.

येथील न्यायप्रविष्ठ सर्व बाबींची पूर्तता केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर शवविच्छेदन झाले. त्यानंतर दुपारी त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि केरळला रवाना झाले. अंत्यविधी ते केरळमध्ये करणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीपीआरमध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक संदीप गळवे सुद्धा उपस्थित होते.

दरम्यान, ज्यांनी हल्ला करून खान याचा खून केला, त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी ताबा मिळविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. संबंधित कैद्यांना ज्या ज्या ठिकाणी शिक्षा झाली आहे. त्या त्या न्यायालयाकडे तसेच मोका न्यायालयाकडे जुना राजवाडा पोलिसांकडून पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये त्यांनी संशयितांना पोलिस कोठडी मिळविण्याची विनंती केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच संशयितांचा ताबा पोलिसांना मिळणार आहे. तोपर्यंत पोलिसांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, नेहमीप्रमाणे सर्वसामान्य खुनाचा तपास ज्या पद्धतीने होतो, दोषारोपपत्र दाखल होते, त्याचप्रमाणे हा सुद्धा गुन्हा दाखल करून तपास होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खुनाचे कारण काय?
खान याचा खून झाला, तत्पूर्वी संशयितांच्या संपर्कात आणखी कोण होते काय? याची ही माहिती घेतली जात आहे. झालेल्या खुनाचे कारण केवळ कैद्यांतील वादच आहे, पूर्ववैमनस्य आहे की आणखी काय आहे, याचाही तपास होणार आहे. खून झालेला खान बॉम्बस्फोटातील आरोपी होता, त्यामुळे या खुनाचे गांभीर्य वाढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com