बेळगाव वार्तापत्र

बेळगाव वार्तापत्र

87725
बेळगाव : येथील आर. पी. डी. कॉलेजमधील मतमोजणी केंद्रासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

87705
जगदीश शेट्टर

87706
प्रियंका जारकीहोळी

87707
विश्‍वेश्‍वर हेगडे-कागेरी

बेळगाव, कारवारात भाजपची सरशी;
चिक्कोडीत काँग्रेसचा निर्णायक विजय
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. ४ : बेळगाव जिल्ह्यातील मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर विजयी झाले आहेत. त्यांनी कॉंग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा पराभव केला आहे. चिक्कोडी मतदारसंघात काँग्रेसच्या प्रियंका जारकीहोळी यांनी भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातील आपला प्रभाव भाजपने कायम ठेवला आहे. कारवारमधून भाजपचे उमेदवार विश्‍वेश्‍वर हेगडे-कागेरी यांनी कॉंग्रेसच्या अंजली निंबाळकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.
बेळगाव जिल्‍ह्यातील कित्तूर व खानापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ कारवार लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे कारवार लोकसभा मतदारसंघातील निकालाकडेही बेळगावकरांचे डोळे लागून राहिले होते. तेथे भाजपच्या हेगडे यांनी मतमोजणीच्या प्रारंभापासून काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांच्यावर आघाडी घेतली होती. ती आघाडी कायम ठेवण्यात हेगडे यांना यश आले. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व चिक्कोडी या दोन्ही मतदारसंघांत दोन्ही पक्षांकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शेट्टर हे मूळचे हुबळीचे असले, तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरविले होते. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री व बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर हे काँग्रेसकडून शेट्टर यांच्या विरोधात होते. मात्र, बेळगाव मतदारसंघातील आपल्या विजयाची परंपरा या निवडणुकीतही भाजपने यावेळी कायम ठेवली. २००४ पासून बेळगाव मतदारसंघातून भाजपला सातत्याने यश मिळाले आहे. यावेळीही बेळगावच्या मतदारांनी भाजपलाच पसंती दिली आहे.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपचे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले व काँग्रेसच्या तरुण उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्यात जोरदार लढत झाली. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका यांना निवडणूक रिंगणात उतरवून काँग्रेसने येथे भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. गतवेळी भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार जोल्ले यांना मिळालेले यश पाहता यावेळी काँग्रेसचा टिकाव लागणार का? असा प्रश्‍न चिक्कोडीमध्ये निर्माण झाला होता. अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळकर यांच्यामुळे काँग्रेसला फटका बसेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्री जारकीहोळी यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची त्यांना मिळालेली साथ यामुळे प्रियांका यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मतमोजणीच्या प्रारंभापासूनच प्रियांका यांनी जोल्ले यांच्याविरोधात आघाडी घेत ती कायम ठेवली. २००९ च्या निवडणुकीपर्यंत चिक्कोडी मतदारसंघात भाजपचा प्रभाव होता. २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी खासदार झाले, पण २०१९ मध्ये चिक्कोडीच्या मतदारांनी पुन्हा भाजपला पसंती दिली. मात्र, आता पुन्हा तेथे काँग्रेसने बाजी मारली आहे. या निकालामुळे बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावरील जारकीहोळी बंधूंचा प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे.
कारवार लोकसभा मतदारसंघावर गेल्या दोन दशकांपासून भाजपचा प्रभाव आहे. भाजपच्या अनंतकुमार हेगडे यांनी सलग सहावेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राज्यघटनेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे यावेळी भाजपने अनंतकुमार यांना उमेदवारी दिली नाही. कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्‍वेश्‍वर हेगडे यांना भाजपने उमेदवारी दिली. काँग्रेसने खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली, पण निंबाळकर यांचा प्रभाव मतदारसंघात दिसला नाही.
-----------------------
चौकट
दोन मतदारसंघांत भाजपला फायदा
भाजपच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगाव व कारवार लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली होती, त्याचा फायदा बेळगाव व कारवारच्या उमेदवारांना झाला. हुबळी येथील नेहा हिरेमठ खून प्रकरणाचा प्रभाव बेळगाव व कारवार या दोन मतदारसंघांवर झाला. त्या प्रकरणाचा भाजपला फायदा झाला. या प्रकरणाचा चिक्कोडीमध्ये मात्र प्रभाव दिसला नाही.
-----------------------
दृष्टिक्षेपात
- बेळगाव लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा भाजपला संधी
- चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्या निवडणुकीत उलटफेर
- नेहा हिरेमठ खून, प्रज्वल रेवण्णा प्रकरणाचा बेळगाव जिल्ह्यावर संमिश्र परिणाम
- मंत्री सतीश जारकीहोळींना दिलासा, तर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना धक्का
- बेळगाव शहर व तालुक्यातील मराठी मतांचा भाजपला झाला फायदा
- काँग्रेस सरकारच्या पंचहमी योजनेला बेळगावच्या मतदारांनी नाकारले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com