जल्लोषाला सुरुवात-

जल्लोषाला सुरुवात-

वाड्यावर, रुईकर कॉलनीत जल्लोष
माने कुटुंबीयांनी अनुभवली हुरहूर व अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, सोबतीला हलगी-घुमक्याचा व साउंड सिस्टमीचा ठेका, उष्म्याने घामाच्या धारा वाहत असताना न दमता त्यावर थिरकणारे कार्यकर्ते, कॉंग्रेसचा झेंडा फडकवत श्रीमंत शाहू महाराजांचे छायाचित्र लावलेल्या दुचाकी-चारचाकींच्या फेऱ्या तसेच विजयाच्या घोषणा अशा जल्लोषाने नवीन राजवाड्याचा परिसर आज दणाणून गेला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे आल्याने परिसर गर्दीने फुलून गेला होता. त्याचवेळी आधी अस्वस्थता, नंतर हुरहूर आणि अखेर गुलालाची उधळण असे वातावरण रुईकर कॉलनीतील खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी होते. तिथेही निकालानंतर जोरदार जल्लोष साजरा केला.

निवडणुकीच्या निकालासाठी नवीन राजवाड्यावर सकाळी आठपासूनच कार्यकर्ते जमले होते. मताधिक्य वाढेल तशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे आकडेवारीवर लक्ष ठेवून होते. पहिल्या दोन फेऱ्यांतच दहा हजारांवर मताधिक्य गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी तसेच विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. काही महिला कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत उघड्या जीपमध्ये बसून परिसरातून फेऱ्या मारल्या.
साडेदहाच्या सुमारास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, त्यांचे लहान बंधू संग्रामसिंह भोसले, व्ही. बी. पाटील, माणिक मंडलिक आदींचे नर्सरी बागेतील कार्यालयात आगमन झाले. फेऱ्यांमधील मताधिक्याची आकडेवारी समजेल, तशी संभाजीराजे व मालोजीराजे छत्रपती कार्यकर्त्यांना सांगत होते. पाचव्या फेरीनंतर शाहू महाराजांचे मताधिक्य तीस हजारांवर पोहचल्याचे सांगताच हालगी-घुमक्याच्या तालावर कार्यकर्त्यांनी मंडपातच ठेका धरण्यास सुरूवात केली. बाहेर साऊंड सिस्टीमवर लावल्या जाणाऱ्या गाण्‍यांनी कार्यकर्त्यांचा जोश आणखीन वाढवला. थोडीशीही उसंत न घेता राजपरिवारातील सर्व सदस्यांनीही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आनंदोत्सव साजरा केला. शहाजीराजे, यशराजे, विश्‍वविजय खानविलकर, व्ही. बी. पाटील, ऋतुराज इंगळे तसेच अनेक माजी नगरसेवक, कॉंग्रेसचे कार्यकर्ते सोबत होते. माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, गोकुळचे संचालक विश्‍वास पाटील, नंदीनी बाभूळकर, सुनील शिंत्रे, सत्यजित जाधव, अभिजित तायशेटे, रामराजे कुपेकर,माजी उपमहापौर संजय मोहिते, रविकिरण इंगवले, शिवाजी कवाळे, कादर मलबारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
खासदार धैर्यशील माने सकाळी सातला नृसिंहवाडीला गेले. त्यावेळी मतदारसंघातून कार्यकर्ते निवासस्थानी आले होते. माजी खासदार निवेदिता माने, पत्नी वेदांतिका माने मतमोजणीचा आढावा घेत होत्या. त्यांच्यासमवेत विश्वजित देसाई, झाकीर भालदार, शीतल खोत, विकासराव माने, कृष्णात मसुदकर उपस्थित होते. ते मतमोजणीच्या ठिकाणाच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होते. खासदार माने व सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यातील मताधिक्य दहाव्या फेरीनंतर कमी-अधिक होऊ लागल्याने माने कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. पंधराव्या फेरीत माने यांचे मताधिक्य वाढल्यानंतर साऱ्यांची उत्सुकता वाढली. त्यानंतर काही क्षणातच विजयी मताधिक्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. मतमोजणीहून अनेकजण थेट रुईकर कॉलनीतील निवासस्थानी आले. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘एकच वादा धैर्यशील दादा’, ‘धैर्यशील दादांचा विजय असो’, असा घोषणा देत, शिवसेनेचा झेंडा हवेत फिरवत, दुचाकींचा आवाज करत परिसर दणाणून सोडला.
...
राजघराणे न्हाले गुलालात
संभाजीराजे व संयोगिताराजे यांनी प्रथम शाहू महाराजांना विजयाचा गुलाल लावला व त्यानंतर कार्यकर्त्यांनी शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील प्रत्येक सदस्यांना गुलाल लावत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांची संख्या इतकी मोठी होती की त्यांच्याकडून लावल्या जात असलेल्या गुलालामुळे शाहू महाराजांसह सारे सदस्य गुलालात न्हाऊन निघाले.
...

शुभेच्छा देण्यासाठी झुंबड
माने यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी पेटल्स मशीनच्या माध्यमातून गुलालाची उधळण केली. हातकणंगले मतदारसंघातील रुकडीसह विविध गावांमधील आणि इचलकरंजी शहरातील तरुण कार्यकर्ते त्याठिकाणी येत होते. माजी खासदार निवेदिता माने, वेदांतिका माने यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com