कार्यकर्ते-नेते दुरावा

कार्यकर्ते-नेते दुरावा

कार्यकर्त्यांनी नेत्यांना दाखवला ‘कात्रजचा घाट’

महायुतीतील चित्र ः नेते एकीकडे तर कार्यकर्त्यांची दिशा दुसरीच

सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. ४ : लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या मागे मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनाच ‘कात्रजचा घाट’ दाखवल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते असे चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले. या निवडणुकीतून कार्यकर्त्यांनीही नेत्यांना धडा शिकवल्याचे बोलले जाते.
दरम्यान, महायुतीतील काही नेत्यांनी खालपर्यंत कार्यकर्त्यांना ‘निरोप’च पोहोचवले नसल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे नेते उमेदवारांच्या व्यासपीठावर तर त्यांना मानणारे कार्यकर्ते दुसऱ्याच उमेदवारांच्या प्रचारात असे पहायला मिळाले. जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघात हे चित्र पहायला मिळाले.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदली. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे के. पी. पाटील आदी नेते त्यांच्या मूळ पक्षातून दुरावले व बाहेर पडलेल्या नेत्यांसोबत गेले.
पक्ष फुटीनंतर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे या निवडणुकीत या नेत्यांसह अन्य पक्षांच्या नेतृत्‍वाचा कस लागणार हे निश्‍चित होते. राष्ट्रवादी व शिवसेनेतून फुटलेल्या गटाने राज्यात भाजपसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे लोकसभेला भाजप जो उमेदवार देईल त्यांचाच प्रचार करावा लागणार हे फुटीर गटातील नेत्यांनाही माहीत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर भाजपसोबत गेलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनाही पर्याय नव्हता. याच महाडिक यांचा २०१९ च्या निवडणुकीत प्रा. मंडलिक यांनी पावणे तीन लाखांना पराभव करूनही त्यांना मंडलिक यांचाच प्रचार करण्याची वेळ आली. कागलमध्ये तर एकमेकांचे तोंडही न बघणारे मुश्रीफ व शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे एकाच व्यासपीठावर दिसू लागले.
या सर्व पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना मात्र नेत्यांनी घेतलेली सोयीची भूमिका आवडली नव्हती. त्याचेच प्रतिबिंब या निवडणुकीत उमटले. काही नेत्यांच्या जवळचे समजले जाणारे आणि लोकांत चांगली प्रतिमा असणारे कार्यकर्तेही प्रचारात दिसले नाहीत. प्रमुख नेते प्रचारात दिसले पण तेही भाषणापुरतेच, त्यानंतरचा त्यांचा वावरही संशयास्पदच होता. त्या त्या मतदारसंघातील विद्यमान किंवा इच्छुकांकडे खालीपर्यंत निरोप पोहचवण्याची जबाबदारी होती, पण मिळालेल्या माहितीनुसार हे निरोपही व्यवस्थित पोहचले नसल्याची चर्चा आता निकालानंत होऊ लागली आहे.
...
विधानसभेची गणिते
या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तर अनेकांनी आपल्या विधानसभेची जोडणी लक्षात घेऊन हात राखूनच भूमिका घेतल्याचे दिसते. आज आपल्या ताकदीच्या जोरावर प्रा. मंडलिक यांना मते मिळाली तर त्याचे श्रेय त्याच मतदारसंघातील आपले विरोधक घेतील आणि त्यामुळे विधानसभेला अडचण होईल यातून राधानगरी, चंदगड, कागलमधील नेत्यांनी आपली विधानसभेची गणिते मांडल्याचे बोलले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com