बालेकिल्ले कोसळले

बालेकिल्ले कोसळले

बालेकिल्ल्यांनी केला मंडलिकांचा घात

अपेक्षित मताधिक्य नाही : कागल, चंदगड, राधानगरीत ‘बॅकफूट’वर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : ज्या विधानसभा मतदारसंघात उच्चांकी मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती, त्याच मतदारसंघांनी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा घात केल्याचे निकालात स्पष्ट झाले. कागलसह चंदगड, राधानगरीतून मोठे मताधिक्य मिळेल आणि उर्वरित तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मिळालेले मताधिक्य कमी होईल, असा बांधलेला अंदाजही फोल ठरला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात करवीर, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, चंदगड, राधानगरी व कागल अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली, त्याचवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर, दक्षिण व उत्तरधून काँग्रेस उमेदवाराला मिळणाऱ्या मताधिक्याविषयी भीती व्यक्त केली होती. पण या तीन मतदारसंघातील मताधिक्य चंदगड, कागल व राधानगरीतून भरून निघेल असा अंदाज बांधला जात होता. पण प्रत्यक्ष बालेकिल्ले समजले जाणाऱ्या या तीन मतदारसंघांनीच प्रा. मंडलिक यांना धोका दिल्याचे स्पष्ट झाले.
कागल हा प्रा. मंडलिक यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१९ मध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे विरोधात होते, तरीही त्यांना तब्बल ७१ हजार ४२७ मतांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे हे त्यांच्यासोबत होते, तरीही अपेक्षित मताधिक्य त्यांना मिळाले नाही. २०१९ मध्ये चंदगडमधूनही प्रा. मंडलिक यांना ५० हजार १३१ मतांचे मताधिक्य होते, यावेळी तेवढे नसले तरी किमान २५ ते ३० हजाराचे मताधिक्य मिळेल अशी शक्यता होती, पण तीही फोल ठरली. राधानगरीत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे के. पी. पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे सोबत असूनही याही मतदारसंघात प्रा. मंडलिक यांचा भ्रमनिरास झाला. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून प्रा. मंडलिक यांना ३९ हजार २१५ मतांचे मताधिक्य होते.
...
तीन मतदारसंघात शाहू महाराजांना लिड
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रा. मंडलिक यांच्या मागे ताकद लावली होती. ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी महाडिक यांना विरोध केला. त्यावेळी सहाही विधानसभा मतदारसंघात प्रा. मंडलिक यांना मताधिक्य होते. पण यावेळी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना करवीर, दक्षिण, उत्तर व राधानगरीतून चांगले मताधिक्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com