चाळीस वर्षानंतर रत्नागिरीत फुलले कमळ

चाळीस वर्षानंतर रत्नागिरीत फुलले कमळ

८७९९५
८७९९६

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात
चाळीस वर्षांनी फुलले कमळ
नारायण राणे ४७ हजार ८५० मतांनी विजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा ४७ हजार ८५० मतांनी पराभव केला. चाळीस वर्षांनंतर प्रथमच या मतदारसंघात राणेंच्या विजयाच्या रुपाने कमळ फुलले; परंतु बालेकिल्ला असलेली शिवसेना येथे प्रायशः रत्नागिरीत पाय रोऊन असल्याचे निवडणुकीतून स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळालेल्या मताधिक्यानेच राणेंना तारले. त्या जोरावर त्यांनी रत्नागिरीतल राऊत यांच्या मताधिक्यावर मात करीत दणदणीत विजयी मिळवत गुलाल उधळला.
रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल मते विनायक राऊत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्टल मते नारायण राणे यांच्या पारड्यात पडली. पहिल्या फेरीने विनायक राऊत यांनी मताधिक्य घेत सुरुवात केली. त्यामुळे पुढे असाच ट्रेंड राहील, अशी अनेकांची अपेक्षा होती; परंतु दुसऱ्या फेरीतच चित्र पालटले. राणे यांनी दोन हजार ३०५ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा राऊत यांनी तिसऱ्या फेरीत आघाडी घेतली. चौथ्या फेरीनंतर राणे यांचे मताधिक्य वाढतच राहिले. सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास राणे मतमोजणी केंद्रावर हजर झाले.
सहाव्या फेरीनंतर प्रत्येक फेरीला राणे यांना मताधिक्य मिळत गेले. १२ व्या फेरीला तर राणेंनी २३ हजार ४५० मतधिक्य घेतले. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघातून राणेंना घसघशीत मताधिक्य मिळत गेले. अगदी उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळमध्ये तर राऊत यांना मोठा धक्का बसला. राणे यांना तेथे मोठे मताधिक्य मिळाले आहे. सुमारे लाखाच्या घरात राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मताधिक्य मिळाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, लांजा-राजापूर आणि रत्नागिरी मतदारसंघांत मात्र राऊत यांना चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे रत्नागिरीत निष्ठावंत शिवसैनिक अजूनही शिवसेनेच्या बाजूने ठाम असल्याचे दिसते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून राणेंना चांगले मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु ९६७८ मताधिक्य महाविकास आघाडीने रत्नागिरीतून घेतले आहे. त्यामुळे महायुती अर्थात सामंत, भाजप येथे कमी पडल्याचे स्पष्ट दिसते.
राणे विजयी घोषित
२५ व्या फेरीनंतर सायंकाळी साडेचार वाजता नाराणय राणे यांनी ४ लाख ४८ हजार ५१४ मते घेतली, तर विनायक राऊत यांनी ४ लाख ६५७ मते मिळाली. नारायण राणे ४७ हजार ८५८ मतांचे मताधिक्य घेऊन दणदणीत विजयी झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी राणे यांना विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्र दिले.

लोकसभेच्या निकालानंतर विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न झाला. विरोधक, आप्त, महायुतीतील मित्र, सहकारी यांचे काम आणि वर्तन नांदा सौख्यभरेला शोभणारे नव्हते. दगाफटका दिल्याची परतफेड होईल. संधी आली की दोष दाखवून देऊ.
- नारायण राणे, विजयी उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com