नवीन राजवाड्यात आज राज्याभिषेक सोहळा

नवीन राजवाड्यात आज राज्याभिषेक सोहळा

८८२५७

शहरासह जिल्ह्यात आज शिवराज्याभिषेक सोहळा
विविध कार्यक्रमांची रेलचेल; मराठा महासंघातर्फे शहरातून भव्य मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ः युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा आज, गुरुवारी (ता. ६) शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विशेष म्हणजे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये हा सोहळा साजरा करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
यानिमित्त नवीन राजवाड्यात राज्याभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यास खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, याज्ञसेनिराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे, यशराजराजे व मान्यवर निमंत्रित मंडळी उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गुरुवारी (ता. ६) सायंकाळी साडेचार वाजता मिरवणूक आयोजित केली आहे. या मिरवणुकीत ३५० बाल शिवाजी, जिजाऊ मॉसाहेब व मावळे वेशभूषेत सहभागी होणार आहेत. याशिवाय एक हजार वारकरीही सहभागी होणार आहेत.
शिवाजी पेठेतील निवृत्ती तरुण मंडळ व निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळाच्या वतीने सकाळी साडेसात वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक, सकाळी दहा वाजता प्रसाद वाटप, सायंकाळी रसिक रंजन मराठी गाण्याचा कार्यक्रम व रात्री आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
विशाळगडावर मराठा तितुका मेळवावा संघटनेमार्फत सकाळी आठ वाजता शिवपालखी पूजन, नऊ वाजता राजवाडा-भगवंतेश्‍वर मंदिर येथे उत्सव मूर्तीवर दुग्धाभिषेक, सत्कार सोहळा, प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

चौकट
नवीन राजवाड्यातील सोहळा असा
- सकाळी पावणेआठ वाजता सनई चौघडा वादन
- सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी मराठा लाईट इन्फंट्री बॅंड, बेळगाव यांचे वादन
- सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी शककर्ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक
- सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पोवाड्याचा कार्यक्रम
- सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी मराठा स्फूर्तिगीत, मर्दानी खेळ प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत

चौकट
विद्यापीठात आज शिवस्वराज्य दिन सोहळा
शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागातर्फे उद्या, गुरुवारी सकाळी सात ते सव्वा दहा या वेळेत शिवस्वराज्य दिन सोहळा होणार आहे. त्याची सुरुवात सकाळी सात वाजता विद्यापीठ प्रांगणात पोवाड्याने होईल. त्यानंतर अभिवादन, शिवज्योत रॅली काढण्यात येणार आहे. मुख्य प्रशासकीय इमारत, उपहारगृह, परीक्षा भवन, राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह मार्गे येणाऱ्या रॅलीची मुख्य इमारत परिसरात सांगता होणार आहे. येथे मर्दानी खेळ, पोवाडा सादरीकरण आणि त्यानंतर राजर्षी शाहू संग्रहालयात राजमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे.

चौकट
चित्र- शिल्प प्रदर्शन आजपासून
चित्रकार आणि शिल्पकारांच्या वतीने उद्या (गुरुवार) पासून शिवराज्याभिषेक चित्र-शिल्प प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेअकरा वाजता प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनातील कलादालनात सलग तीन दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

लंडनमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष
लंडनमधील भारतीय नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास ज्ञात व्हावा, यासाठी कोल्हापूरच्या भाग्यश्री रावराणे - पाटणकर यांनी पुढाकार घेतला आणि लंडनमधील मिल्टन किंग्ज शहरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.
देशभरातील १८ विविध समुदाय तेथे एकत्रितपणे राहतात. त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी त्यांनी तेथे मराठी लोकांना एकत्र करून कलासंस्कृती ग्रुपची स्थापना केली. पारंपरिक सणांसोबतच हादगा, दिवाळीतील किल्ले बनविणे, शिवजयंती असे उपक्रम त्या घेऊ लागल्या. याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी यंदाचा ३५० वा राज्याभिषेक लंडनमध्ये साजरा करण्याचा विचार केलाय. महाराष्ट्राची ओळख जगाला व्हावी, यासाठी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे नियोजन केले. यासाठी सांगली, सातारा आणि कराड येथील मैत्रिणींनी तर योगदान दिलेच, शिवाय केरळ, आंध्र प्रदेशातील मैत्रिणीही हिरिरीने सहभागी झाल्या. शिवरायांची विचारधारा व शिकवण जगाला समजण्यासाठी शिवगर्जनेचे सादरीकरण केले, असे रावराणे - पाटणकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com