शिंदे, दादा गट

शिंदे, दादा गट

शिंदे सेना, अजित पवार गटासमोर आव्हान

लोकसभेच्या पराभवाचे निमित्त ः विधानसभेत जागा मिळवताना होणार दमछाक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पराभवामुळे भाजपसोबत राज्याच्या राजकारणात एकत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्‍वाखालील राष्ट्रवादीसमोर जिल्ह्यात आव्हानांचा डोंगर असणार आहे.
दरम्यान, या निकालाचे परिणाम पाहता विधानसभेत या दोन्ही गटाला भाजपकडून जागा मिळवताना दमछाक होणार आहे. विशेषतः कागल, राधानगरी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य प्रा. मंडलिक यांना न मिळाल्याचे पडसाद विधानसभेच्या जागा वाटपात उमटण्याची शक्यता आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कागल व चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनुक्रमे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील हे दोन आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे राधानगरीचे प्रकाश आबिटकर हे एकमेव आमदार आहेत. कागलमध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात समरजितसिंह घाटगे तर चंदगडमध्ये राजेश पाटील यांच्याविरोधात शिवाजी पाटील यांनी तयारी केली आहे. आबिटकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे के. पी. पाटील इच्छुक आहेत, किंबहुना त्यांनी काल मेळावा घेऊन लढण्याची घोषणाही केली आहे. विधानसभेला महायुती कायम राहिली तर लोकसभेला मिळालेल्या मताधिक्याच्या हिशेबाने या जागा विद्यमानांना मिळवताना त्या पक्ष नेतृत्‍वाची दमछाक होणार आहे.
महायुतीत कोल्हापूर उत्तर शिंदे सेनेकडे तर दक्षिण भाजपकडे आहे. पण या दोन्ही मतदारसंघात प्रा. मंडलिक यांना मताधिक्य मिळालेले नाही. दक्षिणमध्ये काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने या मतदारसंघातील माजी आमदार अमल महाडिक यांचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळेल, पण ‘उत्तर’ च्या जागेवरून शिंदे-भाजपमध्ये संघर्ष अटळ आहे. २००२ च्या पोटनिवडणुकीत ही जागा भाजपला मिळाली आणि ७५ हजार मते घेतली, या जोरावर पुन्हा या जागेवर भाजपकडून दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून आग्रह झाल्यास राज्याच्या राजकारणात लोकसभेतील पराभवाने पिछेहाट झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर पर्यात रहणार नाही, अशी स्थिती आहे. मग शिंदे सेनेकडून या मतदारसंघात तयारी केलेले माजी आमदार राजेश क्षीरसागर काय करणार? हा प्रश्‍न आहे. करवीरमध्ये भाजपकडून तयारी केलेल्या उमेदवारांची वानवा आहे, तिथे शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके हे एकमेव इच्छुक सध्यातरी आहेत. पण अलीकडेच या मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे झालेले निधन, त्यातून निर्माण झालेली सहानुभूती, लोकसभेला या मतदारसंघातून शाहू महाराजांना मिळालेले विक्रमी मताधिक्य याचे आव्हान नरके यांच्यासमोर असेल.
...
भाजप कार्यकर्त्यांतही नाराजी
देशात आणि राज्यातही पक्षाचे सरकार असून कामे होत नसल्याची खदखद भाजप कार्यकर्त्यांची आहे. साधे कार्यकारी अधिकारी पद मिळत नाही, अन्य समितीवर पक्षाचा निष्ठावंत नाही यासारखे अनेक प्रश्‍न आहेत. प्रा. मंडलिक यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांची खदखद व्यक्त केली होती. त्यातून दोन लोकसभेपैकी एक तरी जागा भाजपला घ्यावी, अशीही चर्चा होती. आता महायुतीचा पराभव झाला आणि विधानसभेत पुन्हा हीच युती असेल तर कार्यकर्त्यांना संधी मिळेल का नाही याविषयी साशंकता आहे. त्यातून भाजप कार्यकर्त्यांतही नाराजी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com