रायगड शिवराज्याभिषेक दिन

रायगड शिवराज्याभिषेक दिन

८८२३९
रायगड ः साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर बुधवारी देशभरातून एकवटलेले शिवभक्त.

दुर्गराज रायगड बनला शिवमय
हजारो शिवभक्तांची उपस्थिती; शिवराज्याभिषेकाचा आज मुख्य सोहळा

राजकुमार चौगुले : सकाळ वृत्तसेवा
रायगड, ता. ५ : देशभरातील हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगड येथे उद्या (गुरुवारी) शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवभक्तांमध्ये सळसळता उत्साह आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होणार आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शिवभक्तांचे जथ्थेच्या जथ्थे दुर्गराज रायगडावर दाखल झाले.
सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पोलिसांसह सुमारे तीन हजार सरकारी कर्मचारी कायदा व सुव्यवस्था तसेच नियोजनासाठी येथे सज्ज आहेत. गडावर येणाऱ्या शिवप्रेमींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तब्बल १६ ठिकाणी आरोग्य पथके तैनात आहेत. सोहळ्यादरम्यान गडावर दाखल होणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. गडावर येणाऱ्या शिवप्रेमींसाठी वाहने पार्किंग सुविधा, एसटी सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलिस सुरक्षा तसेच आरोग्य पथक, अशा विविध सरकारी यंत्रणा तयारीला लागल्या आहेत.
राष्ट्रमाता, स्वराज्यजननी जिजाऊ यांना अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. यावेळी होळीचा माळ येथे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके रंगली. महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गडावर आज होणारे कार्यक्रम
मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. मिरवणुकीत पारंपरिक लोककलांचा जागर होणार आहेत. राज नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com