गडहिंग्लजच्या फुटबॉलपटूंचा वृक्षसंवर्धनाचा जागर

गडहिंग्लजच्या फुटबॉलपटूंचा वृक्षसंवर्धनाचा जागर

88313
गडहिंग्लज : डेव्हलपमेंट फुटबॉल लीगच्या खेळाडूंनी पर्यावरण रॅलीतून वृक्षसंवर्धनाचा जागर केला. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
..........
गडहिंग्लजच्या फुटबॉलपटूंचा वृक्षसंवर्धनाचा जागर

शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग : पर्यावरण रॅलीतून नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : येथील नवोदित फुटबॉलपटूंनी वृक्षसंवर्धनाचा जागर केला. निमित्त होते शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमधील खेळाडूंच्या पर्यावरण रॅलीचे. विविध रंगांच्या किटमधील खेळाडूंनी ''झाडे लावा झाडे जगवा'', ''झाडे लावा उष्णता पळवा'', ''पाऊस हवा झाडे लावा'', ''झाडे लावा फळे खा'' अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडला. रॅलीतून खेळाडूंनी वृक्षसंवर्धनासाठी नागरिकांना आवाहन केले. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिशन आणि शिवराज विद्या संकुलने ही रॅली काढली होती.
सायंकाळी सहा वाजता एम. आर. हायस्कूलपासून रॅलीला प्रारंभ झाला. स्पर्धा समन्वयक रोहित साळुंखे, अनिकेत कोले यांनी खेळाडूंचे स्वागत केले. यावेळी पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी खेळाडूंना सांगितले. सहा संघांतील ९० हून अधिक खेळाडू किटसह रॅलीत सहभागी झाले होते. ''वृक्षारोपण करा, निसर्ग जपा'', ''झाडाचे संवर्धन धरतीचे नंदनवन'', ''झाडे लावा, चैत्यन्य फुलवा'' अशा घोषणा देण्यात संघातील खेळाडूंमध्ये चढाओढ रंगली होती. वृक्षसंवर्धनाचे फलक खेळाडूंनी हातात धरले होते.
मुसळे तिकटी, संकेश्र्वर रोड, बसवेश्वर महाराज पुतळा, नेहरू चौक अशी रॅली नेहरू चौकात पोहोचली. याठिकाणी काही नवोदित खेळाडूंनी फुटबॉलच्या कसरती दाखविल्या. दसरा चौक, चर्च रोडवरही फुटबॉल घेऊन विविध खेळ सादर केले. लक्ष्मी मंदिर रोड, नगरपालिका, दसरा चौक, गुणे गल्ली, आझाद रोड, चर्च रोडमार्गे येऊन एम. आर. हायस्कूलवर रॅलीचा समारोप झाला. संतोष नीळकंठ, महेश सुतार, ओमकार सुतार, तानाजी देवेकर, सुल्तान शेख, सागर पोवार, ओमकार घुगरी, यासीन नदाफ आणि सहकाऱ्यांनी रॅलीचे नियोजन केले.
....
चौकट..
रिमझिम पावसातही उत्साह
रॅली सुरू होतानाच मॉन्सूनपूर्व रिमझिम पाऊस सुरू झाला. या पावसातही खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध घोषवाक्यांचे फलक हातात धरून घोषणा देणाऱ्या खेळाडूंनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पावसातील खेळाडूंची घोषणांची चढाओढ ऐकण्यासाठी बाजारपेठेसह प्रमुख चौकांत नागरिकांनी गर्दी केली होती.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com