चेस नंबर बदलले...पण तपासले कोणी ?

चेस नंबर बदलले...पण तपासले कोणी ?

उपशहर प्रमुख एजंटांकडून गोलमाल
‘आरटीओ’ नेतेगिरीच्या विळख्यात; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मौन संशयास्पद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः प्रादेशिक परिवहन कार्यालय एजंट नेत्यांच्या विळख्यात अडकले आहे. ट्रॅव्हलर्सच्या चेसीस नंबर व रजिस्ट्रेशन नंबरमध्ये फेरफार कारवाईतील एकजण एका राजकीय पक्षाचा उपशहर प्रमुख म्हणून काम करत होता. त्याला कोणाचा वरदहस्त होता? प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत? याचा प्रामाणिक तपास झाल्यास अनेकांची पळताभुई थोडी होईल.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कारभारात एजंट नाहीत असे होत नसल्याचे दिसून येते. विनाएजंट काम करायचे झाले तरीही प्रत्येक टप्प्यावर अडवणूक होते. त्यामुळे एंजट म्हणजे या कार्यालयातील एक दुवा मानला जातो. याच एजंटांना आतील आणि बाहेरील अनेक गोष्टी माहिती असतात. त्यामुळे त्यांच्या ‘म्हणण्याला’ येथे मोठे ‘वजन’ असते. येथील एजंट आता नेते झाले आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी ते राजकीय पक्षांचा वापर करतात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एका एजंटाचे कारनामे पुढे आले. अटक केलेल्यापैकी एकाने नुकताच धुमधडाक्यात काही शाखांचे उद्‌घाटन जिल्हा प्रमुखांच्या उपस्थित केले होते. आता, मात्र अटक झाल्यावर जिल्हाप्रमुखांनी पदमुक्त करून त्याची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. ट्रॅव्हलर्सच्या चेसीस नंबर आणि रजिस्ट्रेशनचा मुद्दा पुढे आला आहे; पण येथे एजंट आणि अधिकारी-कर्मचारी यांच्याशी असलेले संबंध तपासात पुढे येणार काय?, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ‘आरटीओ’मध्ये गेल्या काही वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला नाही. त्यामुळे येथील सर्व कारभार ‘स्वच्छ’ आहे म्हणायचे काय? छापा का पडत नाही? तक्रार कोणी दिलेली नाही, असे उत्तर येऊ शकते. पोलिसांनी अधिक गांभीर्याने याचा तपास केला तर कार्यालयातील गुलदस्त्यातील कारण पुढे येईल.

चौकट
थेट कर्मचाऱ्यांच्यासमोर
कामे करून घेण्याचे धाडस

काही महिन्यांपूर्वीच एका एजंटाने कार्यालयाच्या छोट्या प्रवेशद्वारसमोर मोटार उभी केली. त्यावर राजकीय पक्षाचा लोगो होता. खुद्द अधिकाऱ्यांनी त्याला मोटार काढण्यास सांगितले. मात्र, त्याने जुमानले नाही. सरकारी कार्यालयात थेट कर्मचाऱ्यांच्या समोर बसून आपली कामे करून घेण्याचे धाडस वाढले आहे. याला येथील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्याकडेही चौकशी झाली पाहिजे.

चौकट
मोटारींवर राजकीय पक्षाचे लोगो
राजकीय पक्षांचे लोगो वापरून आपण पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे दाखविले जाते. मात्र, त्याच्या मागे त्यांचे काळेधंदे झाकले जातात. आजही काही खासगी सावकार आपल्या मोटारींवर पक्षाचे लोगो वापरत आहेत. दाखवायला एक व प्रत्यक्षात मिळवायला त्यांचे वेगळेच धंदे आहेत. याचाही विचार नेत्यांनी केला पाहिजे. अन्यथा एक दिवस नेत्यांचेही नाव घेण्यास ते पुढे मागे पाहणार नाहीत.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com