‘महामार्गा’चा विकास गेला पाण्यात

‘महामार्गा’चा विकास गेला पाण्यात

GAD77.JPG
88647
निलजी : संकेश्वर-बांदा महामार्गावरील निलजी फाट्याजवळ गटारी नसल्याने दोन्ही बाजूला असलेल्या घरात पावसाचे पाणी शिरून प्रापंचिक नुकसान होत आहे.
-----------------------------------------------
‘महामार्गा’चा विकास गेला पाण्यात
घरात शिरले पाणी ः निलजीत गटार नसल्याने उद्‌भवली परिस्थिती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ ः रस्ते विकासातंर्गत संकेश्वर-बांदा महामार्ग झाला. परंतु, या महामार्गामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या निराकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. निलजी फाट्यावर गटारीचे बांधकाम नसल्याने पावसाचे पाणी थेट दोन्ही बाजूच्या घरांत घुसत आहे. घरात पाणी जाणारा हा कसला विकास? असा संतप्त सवाल करून असला विकास आम्हाला नको आहे, असे संबंधित कुटुंबीय ठणकावून सांगत आहेत.
संकेश्वरपासून सुरू झालेला हा महामार्ग हिटणी, मुत्नाळ, निलजी, हेब्बाळ, दुंडगे, गडहिंग्लजमार्गे पुढे तो आजरा, आंबोली, बांद्याकडे जातो. हिरलगे फाटा या गडहिंग्लज तालुक्याच्या हद्दीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. निलजी फाटा हा नावालाच आहे. मुळात या फाट्यापासूनच गावची सुरूवात होते. हा भाग गावठाण नाही म्हणून फाटा आणि परिसरात पथदिवे नाहीत. महामार्गाच्या दोन्ही बाजुला लोकवस्ती असूनही गटारीसुद्धा केलेल्या नाहीत. येथे नियम व व्यवहाराची सांगड घालण्याची गरज होती. परंतु महामार्ग प्राधिकरणाने येथे केवळ नियमच बघितला. म्हणूनच पथदिवे आणि गटारीविनाच रस्ता केला गेला.
महामार्गाची उंचीही इतकी आहे की रस्त्यापासून जमीन सरासरी पाच ते आठ फुटांपर्यंत आहे. यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी आपोआप सखल भागात चालले आहे. तेथे असलेल्या घराघरांत पाणी घुसत असून संबंधित कुटुंबांचे प्रापंचिक नुकसान होत आहे. फाट्यापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरापर्यंतच महामार्गाच्या दोन्ही बाजूला ५० ते ६० घरे आहेत. त्यांना आता पावसाच्या पाण्याचा त्रास होत आहे. वळीव पावसाने ही अवस्था होत असेल तर पावसाळ्यात जुलै ते सप्टेबरपर्यंत हे रोजचे मरण आहे. पाणी घरात येण्याच्या भीतीने या कुटुंबांना रात्री जागून काढाव्या लागत आहेत. पाऊस सुरू झाला की कुटुंबातील सदस्यांचे काळीज धडधडत आहे. महामार्ग प्रशासनाला काहीशी तरी माणुसकीची भावना लक्षात येत असेल तर तातडीने येथे गटारीचे बांधकाम करावे, अन्यथा निलजीकरांना महामार्ग रोखण्याच्या आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले.
------------
समस्येवर चरीचा मुलामा
दरम्यान, गुरुवारी (ता. ६) मॉन्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसला. या पावसाने रस्त्यावरून येणारे पाणी सखल भागात जात तेथील घरांमध्ये शिरले. याची माहिती ग्रामपंचायतीने संबंधितांना दिली. आज सकाळी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केल्याचे सांगण्यात आले. या प्रश्नावर आता प्राधिकरणाने चर मारून देण्याची ग्वाही दिल्याचे सांगितले. परंतु, गावकरी या तात्पुरत्या उपायावर समाधानी नसून गटर बांधकामासाठी आग्रही आहेत.
-------------
गडहिंग्लजलाही महामार्ग जलमय
गडहिंग्लज शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकही पावसाच्या पाण्याने जलमय होत आहे. कालच्या पावसाने येथे एक ते दीड फूट पाणी साचले होते. यापूर्वी मे महिन्यातील वळीव पावसानेही या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यानंतर पालिका व महामार्ग प्राधिकरणानेही कोणतीच उपाययोजना राबवली नाही. आता पावसाळा तोंडावर आहे. येथे सुद्धा आता रोज तळ्याचे स्वरूप येणार आहे. यामुळे येथील पाणी तुंबण्याच्या समस्येचेही निराकरण करावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com