दौलतची जमिन लाटण्याचा प्रयत्न

दौलतची जमिन लाटण्याचा प्रयत्न

‘दौलत’ची जमिन लाटण्याचा
प्रयत्न हाणून पाडला
मानसिंग खोराटे : शेतकऱ्यांची मालमत्ता अबाधित राखणार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ : ‘दौलत कारखाना अथर्व इंटरट्रेड कंपनीने चालवायला घेतल्यापासून अनेकांनी कारस्थाने रचायला सुरुवात केली आहे. सुरळीत चालतोय म्हटल्यावर त्यांचे पोटशूळ वाढले. दोन महिन्यांपूर्वी कारखान्याची ४० एकर जमीन एका संस्थेच्या नावे करण्याचा प्रयत्न झाला; परंतु तो मी हाणून पाडला. ३९ वर्षांच्या कराराने हा कारखाना माझ्या ताब्यात असून, शेतकऱ्यांच्या मालमत्तेला टाच लागू देणार नाही,’ अशा शब्दांत कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. कारखान्यावर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
खोराटे म्हणाले, ‘२०१९ ला कंपनीने ३९ वर्षांच्या कराराने कारखाना चालवायला घेतला. अनेक अडचणींवर मात करीत आतापर्यंत पाच गाळप हंगाम यशस्वी केले आहेत. आवश्यक ठिकाणी नवीन मशिनरी बसविली आहे. शेतकरी, कामगार व कारखान्यावर आधारित अन्य लोकांची रोजीरोटी चालण्यासाठी हा कारखाना सुरू राहणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, काही लोक सातत्याने आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. वेळ येईल तसे त्यांचे कारनामे उघड करणार आहे. ज्यांचे उसाचे कांडही कारखान्याकडे येत नाही, असे लोक कारखान्याच्या विरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रारी करतात. शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन पुळका व्यक्त करणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत.
‘कारखान्याच्या जप्त केलेल्या साखर विक्रीतून आलेली रक्कम नवहिंद व सह्याद्री क्रेडिट सोसायटींच्या कर्जाच्या दुप्पट रक्कम देऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असा न्यायालयाचा आदेश असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सर्व रक्कम संस्थांना दिली. हे गौडगंबाल बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com