धैर्यशील मानेंना २१४ मतदान केंद्रावर मताधिक्य

धैर्यशील मानेंना २१४ मतदान केंद्रावर मताधिक्य

धैर्यशील मानेंना २१४ मतदान केंद्रांवर मताधिक्य
इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात प्रभाव कायम : सत्यजित पाटील केवळ ४० केंद्रांवर पुढे

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ ः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विजयी उमेदवार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात २५५ पैकी तब्बल २१४ मतदान केंद्रांत आघाडी घेतली आहे. तुलनेने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांना केवळ ४० मतदान केंद्रांवर आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार, शेतकरी नेते राजू शेट्टी यांना कोरोचीमधील एकमेव केंद्रावर मताधिक्य मिळाले आहे. गत वेळीप्रमाणे माने यांनी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांवर मतदानामध्ये पकड कायम ठेवल्याचे निवडणूक निकालानंतर पुढे आले आहे.
गत वेळी इचलकरंजीतूनच माने यांच्या विजयाचा कौल दाखवला होता. तब्बल ७५ हजारांचे मताधिक्य दिल्यामुळे माने यांचा विजय अधिक सोपा झाला होता. या वेळीही मात्र परिस्थिती वेगळी होती. या मतदारसंघातून मताधिक्य मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. अन्य ठिकाणांप्रमाणे इचलकरंजीतही कमी कालावधीत सरुडकर यांच्यासाठी वातावरणनिर्मिती करण्यात विरोधकांना यश आले होते. त्यामुळे निकालावेळी या दोन उमेदवारांमध्ये १५ व्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना पाहावयास मिळाला; मात्र या वेळीही मताधिक्याचे दान मतदारांनी माने यांच्या पारड्यात टाकले.
गत वेळीपेक्षा तब्बल ३६ हजारांचे कमी मताधिक्य दिले असले, तरी माने यांच्या विजयासाठी ते पुरेसे असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. वास्तविक चुरशीने मतदान होईल, असे वातावरण असताना माने यांनी तब्बल २१४ मतदान केंद्रांवर मोठे मताधिक्य घेतले आहे. तुलनेने सरुडकर यांना केवळ ४० केंद्रांवर आघाडी मिळाली. कोरोचीतील एका केंद्रावर शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामध्ये शेट्टी यांना २७३, माने यांना २३५, तर सरुडकर यांना २२६ मते मिळाली आहेत. गत वेळी वंचित आघाडीने ७ मतदान केंद्रांवर आघाडी घेतली होती. यावेळी मात्र वंचित आघाडीला फारसा करिष्मा दाखवता आला नाही.
-----------
मोठ्या मताधिक्याच्या वल्गना ठरल्या फोल
माने व सरुडकर यांच्या प्रचारावेळी मोठे मताधिक्य देण्याच्या घोषणा समर्थक नेतेमंडळींनी केल्या होत्या. माने यांना तर एक लाखांच्या पुढे मताधिक्य देण्याचा निर्धार केला होता. आजी-माजी आमदार माने यांच्या पाठीशी होते, तरीही त्यांना मिळालेले मताधिक्य तुलनेने कमी आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी सरुडकर यांना इचलकरंजीतून मोठे मताधिक्य देण्याची गर्जना केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनी केलेल्या वल्गना फोल ठरल्याचे दिसून आले. यामध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ आपल्या प्रभागात मोठी सभा घेतली. हवा निर्माण केली. मात्र प्रत्यक्षात विरोधी उमेदवाराला अधिक मते मिळाली आहेत. शहरातील तीन प्रमुख भागात असे चित्र दिसले.
-----------
महापालिकेसाठी इच्छुकांनी केली चाचपणी
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक इच्छुक सक्रिय झाले होते. संभाव्य प्रभागांतून यंत्रणा गतिमान करीत राजकीय ताकदीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काहीजण उत्तीर्ण झाले, तर काही जणांना आणखी जोमाने काम करण्याचा इशारा दिला. आता पुन्हा एकदा इच्छुकांना विधानसभा निवडणुकीत रंगीत तालीम घेता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com