वाढ चांगली, पण किडीने कुरतडले

वाढ चांगली, पण किडीने कुरतडले

Published on

GAD28.JPG
94395
भडगाव : ऊन-पावसामुळे सोयाबीनची वाढ चांगली झाली असून, तेच वातावरण पोषक बनल्याने पाने खाणाऱ्या अळींचाही (लाल वर्तुळातील) प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हे पीक संकटात सापडले आहे.
------------------------------------------------------
वाढ चांगली, पण किडीने कुरतडले
सोयाबीनची अवस्था : गडहिंग्लजमध्ये पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी जसे ऊन-पावसाचे पोषक वातावरण तयार झाले, त्याच पद्धतीने किडींच्या प्रादुर्भावालाही हे वातावरण कारणीभूत ठरले आहे. तालुक्यात सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढला असून, शेतकऱ्यांच्या खांद्याला यंदा लवकरच फवारणीचा पंप पाहायला मिळत आहे.
सोयाबीन पिकाची ऊन-पावसाच्या वातावरणामुळे चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांनी कोळपणी व खतांचा डोस देऊन पिकाला बळ देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दुसऱ्या बाजूला याच वातावरणाचा फटका सोयाबीनला बसत आहे. पाने खाणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मोठ्या पावसामुळे या किडीची अंडी धुऊन जाता; परंतु अद्याप मोठा सलग पाऊस नसल्याने अळींची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. ऊन-पावसामुळे या किडींच्या वाढीला पोषक वातावरण मिळाले आहे. चांगली वाढ झालेल्या पिकाला किडीच्या प्रादुर्भावामुळे फटका बसला आहे. पाने खाणाऱ्या अळीमुळे पानातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्याने पिकाची वाढ खुंटते. यामुळे शेतकरी पाठीवर पंप घेऊन पीक वाचविण्याची धडपड करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तालुक्यात सरसकट सोयाबीनवर हे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अधूनमधून वारंवार पाऊस पडत असल्यानेही औषध फवारणीत अडथळा येत असल्याचे चित्र आहे.
-------------
उसापाठोपाठचे नगदी पीक
- गडहिंग्लज तालुक्यात १२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन
- उसापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक
- यंदाच्या चांगल्या वळीव पावसामुळे तालुक्याच्या काही भागांत पेरणी लवकर
- सलग पावसामुळे काही शेती पेरणीसाठी सज्ज करण्याचे काम खोळंबल्याने पेरण्या उशिरा
-------------
किडीचे नियंत्रण असे करा
सोयाबीनवरील किडीचे शेतकऱ्यांनी तत्काळ नियंत्रण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. क्लोरो किंवा हमला प्रत्येकी २० मिली १० लीटर पाण्यातून फवारणी करावी किंवा फिनॉलपॉस २५ मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करण्याचे आवाहन कृषी सहायक अनिल कांबळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.