१०८ रुग्णवाहिका

१०८ रुग्णवाहिका

Published on

‘१०८’ने दिले चार लाख रुग्णांना जीवदान
जिल्ह्यातील चित्र ः राज्यात एक कोटी रुग्ण वाहतुकीचा टप्पा पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२ ः अचानक कोणी गंभीर आजारी पडला, एखाद्या दुर्घटनेत कोणी जखमी झाला किंवा प्रसूती वेदनेमुळे गरोदर माता हतबल झाली, तर त्याला उपचार सेवेपर्यंत पोहोचण्यास पूर्वी विलंब होत होता. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्ण किंवा जखमीला तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन १०८ रुग्णवाहिकांची सेवा सुरू केली. याच सेवेने राज्यभरात १ कोटी रुग्ण वाहतुकीचा टप्पा नुकताच पूर्ण केला. यात कोल्हापूरच्या खडतर भौगोलिक अंतराच्या सेवेत ४ लाख ९ हजार रुग्णांना वेळीच रुग्णालयात पोहोचवून जीवदान देण्यात हातभार लावला आहे.
या सेवेमुळे दहा वर्षांत मृत्युदर जवळपास ५४ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोल्हापुरातील सात डोंगराळ जंगली तालुक्यांत धुवाधार पाऊस, कच्चे रस्ते, वन्यजीवांचा वावर, काळ्याकुट्ट अंधारात वाडीवस्तीवर रात्री-अपरात्री कोणाला रुग्णाला घेण्यासाठी १०८ रुग्णवाहिका २० ते ४० किलो मीटरचा प्रवास करते. अंधारात वाडी वस्तीवरील घर शोधून काढते, काही अंतर खाचखळग्यातून कर्मचारी चालत जातात, रुग्णाला स्ट्रेचरवर घेऊन रुग्णवाहिकेतून तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करतात. याशिवाय महामार्ग, राज्य मार्ग किंवा गल्ली-बोळात होणाऱ्या दुर्घटनांतील जखमींना शहरातील गर्दी, रस्त्यावरील खाचखळगे असे अनेक अडथळे पार करीत रुग्णवाहिका रुग्णांना रेस्क्यू करते. त्यामुळे या सेवेचे मोल ग्रामीण भागात ठळकपणे अधोरेखित होत आहे.

चौकट
कोरोना काळात महत्त्वाचे योगदान
कोरोना काळात जवळपास एक लाखांहून अधिक रुग्णांची वाहतूक १०८ रुग्णवाहिकेने केली. त्यासाठी दिवस-रात्र रुग्णवाहिकांचे पायलट डॉक्टर, परिचारिका व जिल्हा समन्वयक येथे कार्यरत होते. एका दिवसात एक रुग्णवाहिका किमान दहा ते पंधरा रुग्णांची वाहतूक करीत होती. त्यासाठी तीनशे ते पाचशे किलोमीटरचा फेऱ्या सहजपणे करत होते. परिणामी कोरोना होऊनही अनेक रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत झाली. पुण्याची बीव्हीजी कंपनी रुग्णवाहिकाचे संचालन करते.

चौकट
दृष्टिक्षेपात १०८ रुग्णवाहिका....
राज्यातील वाहतूक ः १ कोटी ७८७ रुग्ण
जिल्ह्यातील वाहतूक : ४ लाख ९ हजार रुग्ण
जिल्ह्यात रुग्णवाहिका -३६
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका - ८
बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका - २८
राज्यात रुग्णवाहिका - ९२९
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका -२३३
बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका : ७०४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.