पालकांचे संमतीपत्र घेवून विद्यार्थ्यांना शिक्षण द्या

पालकांचे संमतीपत्र घेवून विद्यार्थ्यांना शिक्षण द्या

94844
...
पालकांचे संमतीपत्र घेवून विद्यार्थ्यांना शिक्षण द्या

शिक्षणाधिकाऱ्यांचे संस्थाचालकांना आवाहन; ‘आरटीई’ बाबत शिवसेना आज निदर्शने करणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ‘शासनाकडून सूचना येईपर्यंत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे संमतीपत्र अथवा हमीपत्र घेवून शिक्षण द्या,’ असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी आज येथे कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थाचालकांना केले. त्याला प्रतिसाद देत ‘आरटीई’मध्ये समावेश झाला नाही, तर शुल्क भरण्याची तयारी असल्याचे पालकांचे हमीपत्र भरून घेऊन त्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्याची तयारी काही संस्थाचालकांनी यावेळी दाखविली.
येथील राम गणेश गडकरी सभागृहात आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागातील अधिकारी, शिवसेनेचे (ठाकरे गट) शिष्टमंडळ, संस्थाचालकांचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. ‘जिल्ह्यातील इयत्ता पहिलीचे ३८०० विद्यार्थी गेल्या महिन्याभरापासून प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याला शासन जबाबदार आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना आरटीईअंतर्गत लवकर प्रवेश द्यावा. त्याबाबत शाळा, शिक्षणसंस्थांना शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे सूचना द्यावी,’ असे शिवसेना उपनेते संजय पवार यांनी सुचविले.
संस्थाचालकांनी आरटीईचा निर्णय येईपर्यंत हमीपत्राच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची सुरुवात उद्या, गुरुवारी सकाळी दहा वाजता नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ परिसरातील निदर्शनाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.
इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे गणेश नायकुडे आणि महेश पोळ यांनी ‘आरटीई’ शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नसल्याने संस्थाचालकांची झालेली आर्थिक अडचण मांडली. शासनाने संबंधित रक्कम लवकर देण्याची त्यांनी मागणी केली. ‘संस्थाचालक आणि पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल,’ असे कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी सांगितले. शासनाकडून ज्या प्रमाणात निधी वर्ग होईल. त्याप्रमाणात संस्थांना प्रतिपूर्तीची रक्कम दिली जाते. ज्या संस्थाचालकांनी त्यांचे ऑडिट रिपोर्ट सादर केले नसल्याने त्यांना शासनाकडून रक्कम वर्ग झाली नसल्याचे शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी सांगितले.
शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र चौगले, संस्थाचालक के. डी. पाटील, मोहन माने, प्रकाश बोते, शिवसेनेचे मंजित माने, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, विराज ओतारी उपस्थित होते.
...
प्रलंबित रकमेसाठी पाठपुरावा करणार
जिल्ह्यातील आरटीईमध्ये सहभागी असलेल्या ३२५ शाळांची सुमारे १० कोटी ८६ लाख रुपये इतकी प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडे प्रलंबित असल्याचे पोळ यांनी सांगितले. त्यावर प्रलंबित रक्कम संस्थाचालकांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com