पावसाची शहर परिसरात विश्रांती

पावसाची शहर परिसरात विश्रांती

Published on

94826
...
पश्चिमेकडे धुवाधार, पूर्वेकडे पावसाची विश्रांती.
जिल्ह्यातील चित्र : राधानगरी ३६.४१, तर काळम्मावाडी धरण २४.३८ टक्के भरले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : जिल्ह्यात धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे, तर शहर आणि परिसरात पावसाने आज विश्रांती घेतली. जुलैच्या सुरुवातीलाच राधानगरी धरणात ३.४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, एकूण क्षमतेच्या ३४.४१ टक्के धरण भरले आहे. दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणातही २४.३८ टक्के पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून पंचगंगेत आज १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधारा येथे सायंकाळी सात वाजता नदीची पाणीपातळी २६ फूट ९ इंच इतकी होती.
जिल्ह्यात जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण चांगले आहे. धरणक्षेत्रात पावसाची बरसात सुरूच आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी चार जुलैला राधानगरी धरणात २.२३ टीएमसी इतका पाणीसाठा होता. तसेच धरण याच दिवशी २७ टक्के भरले होते. यावर्षी राधानगरी धरणात ३.४ टीएमसी पाणीसाठा असून, धरण ३४.४१ टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत शहर आणि परिसरात मात्र आज पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती होती. सकाळपासून एखाद्या सरीचा अपवाद सोडला तर पाऊस पडला नाही. मात्र, धरणक्षेत्रातील पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
...
पाण्याखालील बंधारे
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, चिंचोली व माणगांव, हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी, साळगांव असे २४ बंधारे पाण्याखाली आहेत.
...
धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये )
राधानगरी २.९७, तुळशी १.४७, वारणा १३.२६, दूधगंगा ५.८६, कासारी १.०१, कडवी १.३७, कुंभी ०.९६, पाटगाव १.८२, चिकोत्रा ०.५२, चित्री ०.७१, जंगमहट्टी ०.६१, घटप्रभा१.५६, जांबरे ०.७६, आंबेआहोळ ०.९१, सर्फनाला ०.१२, कोदे लघु प्रकल्प ०.१२
...
राधानगरी तालुक्यात मुसळधार
राधानगरी : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. तुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक १२८ मिलिमीटर पाऊस झाला. तर राधानगरी धरण क्षेत्रावर ११० मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे पातळी चार फुटाने वाढली असून, तीन टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गुरुवार सकाळ पर्यंतच्या बारा तासांत राधानगरी धरण क्षेत्रात ११० मिलिमीटर पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक अधिक आहे. विसर्ग सुरू असूनही या धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. दाजीपूर परिसरात ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुळशी धरण जवळपास ५० टक्के म्हणजे १.५० टीएमसी इतके भरले आहे. त्या खालोखाल काळम्मावाडी धरण क्षेत्रात १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
...
05827
म्हसवे (ता. भुदरगड) : येथे आठवडाभर सुरू असणाऱ्या पावसामुळे वेदगंगा नदी तुडुंब भरली आहे. म्हसवे बंधारा येथे वाहणारे पाणी. (अरविंद सुतार : सकाळ छायाचित्रसेवा)
...
वेदगंगेच्या पाणी पातळीत वाढ
कोनवडे : गेले काही दिवस संततधार सुरू असलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नदीपात्र अर्ध्याहून अधिक भरून वाहत आहे. पावसामुळे पिकांना चांगला दिलासा मिळाला आहे.
...
साळगाव बंधाऱ्यावरील पाणी ओसरले
आजरा : तालुक्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तुरळक सरी वगळता गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. बुधवारी (ता. ३) मध्यरात्री पाण्याखाली गेलेल्या हिरण्यकेशी बंधाऱ्यावरील पाणी आज उतरलेले आहे. या मार्गावरून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. गेले आठवडाभर तालुक्यात पाऊस सुरू होता. या दोन दिवसांत तर दमदार पाऊस झाला. पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले असून, भात रोप लावणीची कामे सुरू झाली आहेत. ओढे, नाल्यांसह हिरण्यकेशी, चित्रा नदीला पाणी आले आहे. साळगाव येथील बंधारा बुधवारी पाण्याखाली गेला होता. आज दुपारनंतर या बंधाऱ्यावरील पाणी ओसरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.