प्रा. कृष्णा किरवले यांच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

प्रा. कृष्णा किरवले यांच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

९५०२० ः आरोपी प्रीतम पाटील

प्रा. कृष्णा किरवले यांच्या
खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
बंगल्याच्या खरेदी व्यवहारातून कृत्य


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत प्रा. कृष्णा किरवले यांचा खून केल्याप्रकरणी त्यांचा शेजारी प्रीतम गणपती पाटील (वय ४७, रा. म्हाडा कॉलनी, एसएससी बोर्डाजवळ) याला आज न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.
प्रा. डॉ. किरवले यांच्या घरातील फर्निचरचे काम प्रीतम पाटील याने केले होते. त्याच्याशी ओळख असल्याने घरात येणे-जाणेही होते. किरवले यांचा ते रहात असलेला बंगला खरेदी व्यवहारावरून प्रीतम पाटील याच्याशी वाद झाला होता. या कारणातून चिडून आरोपी प्रीतमने किरवले यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने दुकानातून कोयता विकत आणला. दुपारी त्यांच्या घरात शिरून खरेदीचे संचकारपत्र मागितले. त्याला नकार दिल्याने कोयत्याने कपाळावर, मानेवर, गळ्यावर, डोक्यात गंभीर वार केले. यामध्ये प्रा. किरवले यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार ३ मार्च २०१७ ला घडला होता.

प्रा. डॉ. किरवले यांचा खून करून प्रीतम पाटील बाहेर पडला. यानंतर त्याने आई मंगला पाटील यांना खुनाच्या ठिकाणी पाठवून कोयता व पिशवी बाहेर आणून फेकून देण्यास सांगितले. तसेच रक्ताने माखलेले कपडे, कोयता दलदलीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यासाठी मदत करणाऱ्या मंगला पाटील यांचे निधन झाले आहे.
प्रा. डॉ. किरवले यांचा खून झाल्याचे समजताच पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक विचारवंत, कार्यकर्ते, विद्यार्थी त्यांच्या बंगल्याबाहेर जमले होते. खुनामागील नेमके कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. रात्री उशिरा जमावाकडून संशयिताच्या घराची तोडफोडही करण्यात आली होती.
याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमृत देशमुख यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. सरकारी वकील ए. ए. तांबेकर यांनी १७ साक्षीदार तपासले. त्यांनी नोंदवलेल्या साक्षी, पुरावे व युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तपासकामी उपनिरीक्षक किशोर डोंगरे, अशोक शिंगे, नाझनीन देसाई यांनी सरकारी पक्षाला मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com