आजरा ः ढिगाऱ्याखाली सापडून महीला जखमी

आजरा ः ढिगाऱ्याखाली सापडून महीला जखमी

95372
कोवाडे (ता. आजरा) ः येथे पावसामुळे कोसळलेले घर.
ajr72/ 95373 भारती भाटले


ढिगाऱ्याखाली सापडून महिला जखमी
कोवाडेत घर कोसळले ः चार जनावरांनाही दुखापत

सकाळ वृत्तसेवा
भादवण, ता. ७ ः कोवाडे (ता. आजरा) येथे पावसामुळे घर जनावरांच्या गोठ्यावर कोसळल्याने भारती संजय भाटले (वय ४८) या गंभीर जखमी झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली चार जनावरे अडकल्यामुळे त्यांनाही दुखापत झाली आहे. आज रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ग्रामस्थांनी ढिगारा उपसून भाटले यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. संजय रामू भाटले यांच्या राहत्या घराशेजारी जनावरांचा गोठा आहे. दोन म्हैशी, गाय व रेडी अशी जनावरे आहेत. आज पहाटे भारती या गोठा स्वच्छ करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, अचानक घराच्या तीनही भिंती एकमेकावर कोसळल्या. ढिगाऱ्याखाली भारती व जनावरे अडकली. जोरात आवाज झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी भारती यांचा शोध सुरू केला. त्या शेण टाकण्यासाठी परसात गेल्याची शक्यता घरच्यांनी व्यक्त केली. पण, त्या परसातही आढळल्या नाहीत. ग्रामस्थ व त्यांचा मुलगा विनायक भाटले याला जखमी जनावरे बाजूला करताना केसाचा बुचडा दिसला. सर्वांनी ढिगारा व साहित्य बाजूला हटवण्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली बेशुध्द अवस्थेत भारती मिळाल्या. त्यांना प्रथमोपचारानंतर त्यांना गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यांमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. एका म्हैशीचे व रेडीचे शिंग मोडले आहे. अन्य म्हैशी, गाय यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. तहसीलदार समीर माने यांनी तातडीने पंचनामा करण्याची सूचना दिली आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, मंडल अधिकारी कुरणे, पशुसंवर्धन अधिकारी (विस्तार) पी. डी. ढेकळे यांनी भेट दिली. सरपंच संतोष चौगले, ग्रामसेवक संतोष कुंभार यांनी घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली.

चौकट-
‘त्या’ घटनेची आठवण झाली ताजी
गतवर्षीच्या पावसाळ्यात किणे (ता. आजरा) येथे अंगावर भिंत कोसळल्याने सुनीता गुडूळकर ठार झाल्या होत्या. त्याही सकाळी जनावरांच्या गोठ्यामध्ये दूध काढण्यासाठी गेल्या होत्या. त्या घटनेची चर्चा घटनास्थळावर होती.

चौकट
धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर
आजरा तालुक्यात धोकादायक घरे आहेत. पावसाळ्यापूर्वी घरमालकांना आजरा नगरपंचायत व ग्रामपंचायतींनी नोटिसा दिल्या आहेत. अशा धोकादायक घरात आजही नागरिक राहतात. या घटनेवरून प्रशासन गंभीर झाले असून, संबंधितांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाणार आहे. याबाबत कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार माने यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com