बिग स्टोरी

बिग स्टोरी

Published on

बिग स्टोरीः लोगो

फोटो - बी. डी. चेचर
...
अंगणवाडीशी जोडली १४ हजार बालके
शहरातील चित्र : अंगणवाडी सेविकांचे कुपोषणमुक्तीसाठी सकारात्मक प्रयत्न
नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सुरुवातीला १०० अंगणवाड्या सुरू झाल्या. आता ही संख्या २०० वर पोहोचली आहे. पूर्वी या अंगणवाड्यांमध्ये फक्त झोपडपट्टीतील बालकांना प्रवेश असायचा. मात्र, मुलांना मिळत असलेल्या सोयीसुविधा, पोषण आहार आणि हसत खेळत शिक्षण यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील बालकांनाही पालक अंगणवाडीत प्रवेश देत आहेत. सध्या शहरात सुमारे १४ हजार बालके अंगणवाडीशी जोडली गेली आहेत. अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कुपोषणमुक्तीसाठीच्या प्रयत्नांमुळे अत्यल्प बालके कुपोषित असल्याचे चित्र आहे.
सकाळी साडेदहा वाजता अंगणवाडी उघडते. अकरापर्यंत बालकांची किलबिल सुरू होते. सुरुवातीला प्रार्थना झाल्यानंतर मुलांचे हसत खेळत शिक्षण सुरू होते. अंगणवाडी सेविकांना आदल्या रात्री मिळालेल्या सूचनांनुसार त्या त्या दिवशीचा बालकांचा अभ्यास ठरतो. बडबडगीते गात, बालकांचा बौद्धिक, मानसिक आणि भावनात्मक विकास होईल, असे खेळ शिकवले जातात. मुलांचे गट करून त्या गटात हे खेळ खेळताना मुले गुंग होतात. साधारण दुपारी एकपर्यंत अध्यापनाची प्रक्रिया सुरू राहते. दुपारी एकनंतर पोषण आहाराचे वाटप होते. कधी खिचडी, मुगडाळ भात, उप्पीट, शिरा तसेच चिक्की, राजगिरा लाडू व चिरमुरा लाडू असा खाऊ खाऊन मुले अंगणवाडीतून बाहेर पडतात. तीन ते चार तासांत घेतलेल्या हसत खेळत शिक्षणाची शिदोरी घेऊन बालके तीन वर्षांपासून ते सहा वर्षांपर्यंत अंगणवाडीत रमतात.
ँमहिन्याच्या प्रत्येक एक ते पाच तारखेपर्यंत बालकांची उंची व वजन यांच्या नोंदी सुरू असतात. यातून बालकाचे वजन व उंची वयाप्रमाणे आहे का?, याची काळजी घेतली जाते. जर एखादे बालक कमकुमत असेल तर त्याला विशेष सुविधा दिल्या जातात. त्याच्या वजनवाढीसाठी अंगणवाडी सेविका प्रयत्न करते. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील ० ते ३ वर्षांपर्यंतच्या बालकांना प्रिमिक्स प्रकारातील खाऊ घरी दिला जातो. मुगडाळ, तूरडाळ असलेली खिचडी, लापशीचे प्रिमिक्स बालकाच्या पालकांना घरात शिजवून देता येईल, अशा पद्धतीचा हा खाऊ असतो. हा खाऊ आल्यानंतर तो घेण्यासाठी अंगणवाडीत गजबज असते. गरोदर मातांची दर महिन्यातील तपासणी देखील अंगणवाडीतच केली जाते. बालकांचे लसीकरणही अंगणवाडीत केल्याने बालक मृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. तसेच कुपोषणमुक्ती देखील अंगणवाड्यांमुळे परिणामकारक ठरू लागली आहे.
...
अंगणवाडीत मिळणाऱ्या सुविधा
- पुरक पोषण आहार
- लसीकरण
- आरोग्य तपासणी
- अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण
- आरोग्य व आहार शिक्षण
-------
दृष्टीक्षेपात शहरातील अंगणवाड्या
अंगणवाड्या- २००
अंगणवाडी सेविका-२००
अंगणवाडी मदतनीस-२००
पर्यवेक्षिका-८
...

‘झोपडपट्टीतील बालकांचे आरोग्य सदृढ व्हावे, यासाठी अंगणवाड्यांच्या प्रकल्प शहरात सुरू झाला. सध्या अंगणवाड्यांची संख्या वाढली असून, झोपडपट्टीतील बालकांसोबतच इतर बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनात्मक विकासासाठी अंगणवाड्यांमध्ये प्रयत्न केले जातात. सध्या सुमारे १४ हजार बालके अंगणवाड्यांमधील सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत.
- राजश्री निवेकर, पर्यवेक्षिका
...
लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे काम
सध्या अंगणवाड्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत. हे काम त्यांच्या जबाबदारीत येत नसले तरीही बालकांना सांभाळत महिलांच्या गर्दीला आवरत तिहेरी जबाबदाऱ्या यशस्वी पेलत आहेत. मात्र, कुपोषण मुक्तीसाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविकांना फक्त बालक आणि गरोदर मातांचेच काम दिल्यास या परिणामांमध्ये आणखी सुधारणा नक्कीच दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.