वडणगेत विद्युतराने घेतला शेतकऱ्याचा बळी

वडणगेत विद्युतराने घेतला शेतकऱ्याचा बळी

Published on

KOP24M95821
वडणगे (ता. करवीर) ः येथील शेतात तुटुन पडलेली हीच ती वीजवाहिनी.

KOP24M95820 - 95820

तुटलेल्या वीज वाहिनीने
घेतला शेतकऱ्याचा बळी
वडणगेमधील शेतात खत टाकताना दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. ८ ः शेतात तुटून पडलेल्या वीज वाहिनीचा स्पर्श होऊन वडणगे (ता. करवीर) येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विक्रम संजय साखळकर (वय ३३, साखळकर मळा परिसर, वडणगे) असे त्‍याचे नाव आहे. शेतात खत टाकण्यासाठी जाताना तुटलेली तार गवतामुळे दिसली नाही. त्याच तारेला स्पर्श झाल्यामुळे विक्रमला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याने आरडाओरडा केला; मात्र आजूबाजूचे त्याच्या बचावासाठी जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः वडगणे येथील साखळकर परिवार शेती करतो. त्यांच्या घरापासून साधारण अर्धा किलोमीटरवर त्यांची शेती आहे. आज घरातील सर्वजण शेतात गेले होते. शेताच्या बांधाजवळ सायंकाळी चारच्या सुमारास खत टाकण्यासाठी विक्रम डोक्यावर टोपली घेऊन गेला होता. बांधावर जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. तेथे तुटून पडलेल्या वीज वाहिनीला त्याचा स्पर्श झाला. क्षणात त्याला शॉक बसल्यामुळे तो ओरडू लागला. आजूबाजूला साधारण दीड-दोनशे मीटरवर असलेले त्याचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोहोचले; मात्र त्याला वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
घटनास्थळी असलेल्या नातेवाइकांनी विक्रमला तातडीने सीपीआरमध्‍ये दाखल केले. ही घटना कळताच गावातील अनेकांनी थेट सीपीआरमध्ये धाव घेतली. विक्रमची आई दूध डेअरी संचालक आहे. त्यांचा गावात मोठा जनसंपर्क आहे. घटनेनंतर गावातील तरुणांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. साधारण सहानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळीही तेथे गावकरी थांबून होते. याबाबत फिर्याद देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. विक्रमच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. घटनास्थळाची छायाचित्रेही स्थानिकांनी घेतली आहेत. विक्रमला विजेचा धक्का बसल्यानंतर तो धडपडत होता. त्याच्या हातातील खताची पाटी तेथे फेकली गेली. हे पाहून स्थानिकांनाही गहिवरून आले. तुटलेल्या या वाहिनीतून वीज प्रवाह दीर्घकाळ सुरूच होता, असेही स्थानिकांनी सांगितले.

विक्रमला विजेचा धक्का बसल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी काठी मिळविण्याचा प्रयत्न केला. परिसरात काठी न मिळाल्यामुळे विक्रमला वाचविणे शक्य झाले नाही. शेतात काम करताना कोणाकडेही मोबाईल हॅण्डसेट नव्हता. त्यामुळे तातडीने वीज प्रवाह बंद करण्यास सांगणे कोणालाही शक्य झाले नसल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.