मुलीच्या पाचवी पुजन्यापूर्वीच बापाचा मृत्यू.

मुलीच्या पाचवी पुजन्यापूर्वीच बापाचा मृत्यू.

Published on

मुलीच्या पाचवी पूजनाच्या पूर्वसंध्येला बापाचा मृत्यू
वडणगेतील दुर्दैवी घटना : अवघ्या ३३ व्या वर्षी शेतकऱ्याचा मृत्यू

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः चार दिवसांपूर्वी त्यांना मुलगी झाली. आज सायंकाळी मुलीसह आईला घरी घेऊन जायचे होते. उद्या पाचवी पूजनाचा कार्यक्रम होता. त्याच्या तयारीचीही चर्चा घरी झाली होती. मात्र, पाचवी पूजनाच्या पूर्वसंध्येला विपरीत घडले. शेतात तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला आणि बापाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने केवळ विक्रम संजय साखळकर कुटुंबीयच नव्हे तर अख्ख वडणगे (ता. करवीर) गाव शोककळात बुडाले.
विक्रम साखळकर हे शेतकरी. वय वर्षे ३३. पत्नी, एक मुलगी, आई-वडील असा त्यांचा परिवार होता. चार दिवसांपूर्वीच पत्नीची प्रसूती झाली आणि आणखी एक मुलगी जन्माला आली. दिवसभरातील शेतातील काम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाचवी पूजनाचा कार्यक्रम करण्याबाबत घरी चर्चा झाली होती. सायंकाळी पत्नीसह मुलीला घरी आणण्याबाबतची तयारीही झाली होती. मात्र, पूर्व संध्येलाच त्यांना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला आणि आनंदाच्या वातावरणाचे दुःखात रुपांतर झाले.
विक्रमचे चुलत भाऊ, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी शवविच्छेदन खोलीबाहेर हुंदका आवरत थांबले होते. एका खोलीत शवविच्छेदन सुरू होते, तर दुसऱ्या शेजारील खोलीत विक्रमची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. बाहेर रुग्णवाहिकेसह मित्रमंडळी किती वाईट घटना आहे यावर दबक्या आवाजात बोलत होते. प्रत्येकाचे डोळे पानावलेले होते. तरीही विक्रम साखळकरबाबतची माहिती ते देत होते. विक्रमचे सासरेही तेथे थांबून होते. प्रत्यकेजण विक्रमच्या कुटुंबीयांना धीर देत होते. विक्रमच्या पत्नीला ही माहिती कशी द्यायची याबाबतही चर्चा होत होती. जन्मलेल्या मुलीसह आईला थेट अंत्यसंस्‍काराच्या ठिकाणी कसे घेऊन जायचे याची चिंता कुटुंबीयांसह तेथे थांबलेल्या अनेकांना होती. तरीही आज त्यांनी घरी घेऊन जावेच लागेल, असेही काहींनी सांगितले.

चौकट
मेलो मेलो म्हणून ओरडू लागला, पण...
विक्रमचा सख्खा चुलत भाऊ नितीन यांनीही त्यांची माहिती दिली. ज्यावेळी शेतात विजेचा धक्का लागला त्यावेळी विक्रम जोर जोराने मेलो मेलो म्हणून ओरडू लागला. आम्ही सर्वजण तातडीने तेथे धावत गेलो. त्याचा पाठीला विद्युत तार चिकटलेली होती. मात्र, काठी मिळाली नसल्यामुळे त्याला सोडविणे शक्य झाले नाही. तार तेथेच पडली होती आणि विक्रम ओरडत होता, असे सांगतानाही त्याच्यासह तेथे असलेल्यांचे डोळे पानावले होते.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.