शेअर मार्केट फसवणूक

शेअर मार्केट फसवणूक

Published on

फाईल फोटो
...
अज्ञानातून केलेली गुंतवणूक येतेय अंगलट
व्हॉटसॲपवरील अनोळखी ग्रुपकडून शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक

गौरव डोंगरे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : केवळ १५ मिनिटांत शिका ट्रेड्रिंग....दहा हजारात सुरूवात करा ट्रेड्रिंग आणि करोडपती बना.... माझ्या टेलिग्राम चॅनेलवर आलात तर लखपती व्हाल... अशा भूलथापांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेअर मार्केटचा ‘ब्र’ माहीत नसणाऱ्या अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून आपली आयुष्याची कमाई त्यांच्या हाती देत आहेत. १० लाखांपासून कोट्यवधींची रक्कम गुंतवल्याची धारणा करून फायद्याच्या आशेवर बसलेल्यांची फसगत झाल्याचे प्रकार एकापाठोपाठ समोर येत आहेत.
बॅंकांमधील गुंतवणुकांहून अधिक पटींच्या फायद्याचे आमिष दाखविणारे अनेक ‘शेअर मार्केट गुरू’ सोशल मीडियावर सध्या सक्रिय झाले आहेत. ज्या लोकांनी आजपर्यंत कधीही शेअर मार्केट म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे गुंतवणूकदार अनोळखी लोकांची शिकार बनत आहेत. शेअर्सची खरेदी, म्युच्युअल फंड, ट्रेड्रिंग, इक्विटी, ऑक्शन याची पूर्ण माहिती न घेता अज्ञानाने केलेली ही गुंतवणूक सध्या अनेकांच्या अंगलट येत आहे. तर अशा लोकांना खोटी माहिती देऊन शेअर मार्केट बदनाम करणाऱ्यांचेही जाळे फोफावत चालले आहे.
...
ऑनलाईन क्लासेस, गुंतवणूक ग्रुप अन् चॅनेल्स
व्हॉटस्ॲप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर करून लोकांना खोटी माहिती देत ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येते. संबधितांची आर्थिक स्थिती पाहून त्यांच्याकडून पैसे स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले जातात. गुंतवणुकीवर भरमसाठ फायदा मिळत असल्याचे भासवून खोटे स्क्रीनशॉट, पावत्या दाखवून विश्वास संपादन केला जातो. अशाच पद्धतीने शहरात गेल्या काही दिवसांत फसवणूक करणाऱ्यांचा सुळसुळाट सुरू आहे.
...
सेवानिवृत्त शिक्षिका, व्यावसायिक लक्ष्य
शहरातील एका ज्येष्ठ व्यावसायिकाला व्हॉटसॲपवरून एका ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. १३ वेगवेगळ्या खात्यांवर त्यांच्याकडून दोन कोटी ५१ लाख रुपये स्वीकारण्यात आले. व्हॉटसॲपवरच बोलणाऱ्या पाच जणांनी त्यांची दिशाभूल करत अचानक ग्रुप बंद केल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. तर एका सेवानिवृत्त शिक्षिकेची फेसबुकवरून ओळख वाढवत आयपीओ व ब्लॉक ट्रेड्रिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५८ लाख ६३ हजारांची रक्कम स्वीकारण्यात आली. पण या शिक्षिकेकडून पैसे घेणाऱ्यांनीही ग्रुप बंद केल्याचे समोर येताच संबंधित शिक्षिकेला मोठा धक्का बसला.
...
‘अनेक नामांकित बॅंका, कंपन्यांकडून गुंतवणुकीचे पर्याय दिले आहेत. म्युच्युअल फंडासारखा चांगला परतावा देणाराही मार्ग आहे. यासाठी अशा कंपनीकडून केवळ एक ते दीड टक्का फी घेऊन सल्ला दिला जातो. परंतु लोक अशा ठिकाणी न जाता अनोळखी लोकांच्या हाती आपले पैसे देऊन मोठ्या फायद्याची आशा करतात. तुमची गुंतवणूक योग्य कंपनीत, योग्य व्यक्तीकडून झाली आहे का, याची खातरजमा केल्यास फसवणूक टाळता येईल.
-अरुण पाडळकर, शेअर मार्केट अभ्यासक
...
(पूर्वार्ध)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.