चंदगडला विद्यार्थी वाहतुकीचे तीनतेरा

चंदगडला विद्यार्थी वाहतुकीचे तीनतेरा

95966
सुपे ः आरटीओ तपासणी नाक्याजवळ उलटलेली विद्यार्थी वाहतूक मिनी बस.
...............
चंदगडला विद्यार्थी वाहतुकीचे तीनतेरा

खासगी वाहतुकीला प्राधान्य; लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ९ ः बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर विद्यार्थी वाहतूक करणारी खासगी मिनी बस सोमवारी सकाळी आरटीओ तपासणी नाक्याजवळच उलटली. यामध्ये एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली. यानिमित्ताने विद्यार्थी सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. एसटी आगाराकडे बसची अपुरी संख्या आणि अपुरे कर्मचारी हेच या प्रश्नाचे मूळ आहे. ते सोडविण्यासाठी राजकीय ताकद महत्त्वाची आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी संवेदनशीलपणे पाहत नाहीत, असा सार्वत्रिक चर्चेचा सूर आहे.
चंदगड तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी परिसरातील विद्यार्थ्यांना मध्यवर्ती गावांत यावे लागते. त्यासाठी एसटी हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, कोरोना महामारीदरम्यान आगाराकडील बसमध्ये कपात केली. त्या पुन्हा वाढवलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. ग्रामीण मार्गावर मागणी असूनही केवळ या कारणास्तव आगार व्यवस्थापन नियोजन करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आगाराकडे बस आणि कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. मात्र, त्यांचीही उदासीनता विचारात घेऊन पालकांनी खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारला आहे.
तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून पहाटे खासगी वाहनातून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत येतात. काही पालकांनी पाल्याला दुचाकी घेऊन दिली आहे. विद्यार्थिनींचेही दुचाकी वापरण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. मुळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेटकी नसेल तर अनेक प्रश्नांचा गुंता तयार होतो. रस्त्यावर वाहतूक वाढते. अपघाताचे प्रमाण वाढते. बाजारपेठेत वाहतूक कोंडीबरोबरच प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. इतक्या गंभीरपणे विचार करण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही.
....
चौकट...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी भक्कम
विद्यार्थी वाहतुकीसाठी ज्या खासगी गाड्यांचा वापर केला जातो त्या सुस्थितीत आहेत की नाहीत, चालक प्रशिक्षित आहे की नाही याबाबत विचार केला जात नाही. पर्यायाने शिक्षणासाठी जीवावर उदार होऊन प्रवास करण्याची वेळ येते. अपघात घडल्यास कोवळ्या जीवांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पालकांना त्रास होतो. त्याला उत्तर शोधायचे झाल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीच कामी येणार आहे.
...
कोट...
माझी एक मुलगी नागणवाडी येथे, तर दुसरी चंदगडला शिक्षणासाठी जाते. वेळेवर एसटी बस नसल्याने एक, दोन-तास चुकतात. पर्याय म्हणून मी त्यांना दुचाकीवरून शाळेत सोडतो आणि सायंकाळी परत घेऊन येतो. काही पालकांनी खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारला आहे, तर काहींनी पाल्यांना दुचाकी घेऊन दिल्या आहेत. एसटीची वाहतूक व्यवस्था सुधारल्यास हा प्रश्न सहज सुटणार आहे.
- नितीन पाटील, पालक, बेळेभाट, ता. चंदगड.
......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com