आजरा तालुक्यात पाच लाखांचे नुकसान

आजरा तालुक्यात पाच लाखांचे नुकसान

Published on

ajr91.jpg....
95982
आवंडी वसाहत (ता. आजरा) ः येथे पावसामुळे कोसळलेली समाजमंदिराची इमारत.
----------------------
आजरा तालुक्यात पाच लाखांचे नुकसान
पाच घरांची पडझड ः दोन विहिरी कोसळल्या; प्रशासन सतर्क
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः चार-पाच दिवस झालेल्या पावसामुळे तालुक्यात घरांची पडझड सुरू आहे. तालुक्यात पाच घरांची पडझड झाली असून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दोन विहिरी कोसळल्या आहेत. सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. कोवाडे येथील घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले असून धोकादायक घरांची माहिती मागवली आहे. आजअखेर तालुक्यात ४२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोसळणाऱ्या संततधार पावसाने सोमवारपासून (ता. ८) विश्रांती घेतली आहे. तालुक्यात पावसाळी वातावरण असले, तरी उन्हही पडले आहे. चार दिवस चांगला पाऊस झाल्याने ओढे-नाल्यांसह हिरण्यकेशी व चित्रा नदी दुथडी वाहत आहे. शेतीकामांना वेग आला आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागात भातरोप लावणीचे काम वेगाने सुरू आहे. दिवसभर शेतीकामांसाठी शिवारे गजबजलेली असून गावात नीरव शांतता पाहावयास मिळत आहे. येथे झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाच घरांची व दोन विहिरींची पडझड झाली आहे. सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात जूनपासून आजअखेर ४२० मिलिमीर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात अनेक गावांत धोकादायक घरे आहेत. याबाबतची माहिती पंचायत समितीतर्फे घेण्यात येत आहे. धोकादायक घरांना तातडीने नोटीस देण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. या घरातील राहणाऱ्यांचे स्थलांतर सुरक्षित जागी करावे, अशी सूचना दिल्याचे तहसीलदार समीर माने व गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी माहिती दिली. आजरा नगरपंचायतीने शहरातील धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटिसा दिल्या आहेत. धोकादायक इमारती काढून घ्याव्यात, अन्यथा त्यांची दुरुस्ती करावी, अशी सूचना संबंधितांना केली आहे.
--------------
आवंडीतील समाजमंदिराची इमारत कोसळली
आवंडी वसाहत (ता. आजरा) येथील समाजमंदिराची इमारत पावसाच्या माऱ्यामुळे कोसळली आहे. इमारतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. इमारतीची भिंत कोसळल्यामुळे छप्पर खाली आले आहे. इमारतीच्या परिसरात वावरण्यास ग्रामस्थांना मज्जाव केला आहे.
--------------
चार गावांमध्ये दरड कोसळण्याची भीती
आजरा तालुक्यातील हरपवडेपैकी धनगरवाडा, पेरणली, पेरणलीपैकी नावलकरवाडी, वझरेपैकी खोतवाडी या चार गावांत दरड कोसळण्याची भीती आहे. या परिसराला तहसीलदार श्री. माने यांनी भेट देऊन ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.