गड- वेश्या अड्डा सुधारीत

गड- वेश्या अड्डा सुधारीत

गडहिंग्लजला भरवस्तीत वेश्या अड्डा
पोलिसांचा छापा ः चालकांसह पाच जणांना दोन दिवसांची कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ ः शहराच्या हुजरे गल्लीसारख्या रहिवास भागातील एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी काल (सोमवारी) रात्री छापा टाकला. यामध्ये दोन महिलांना ताब्यात घेण्यासह पाच जणांना अटक केली. दरम्यान, अटकेतील सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली असून, दोन्ही महिलांना सुधारगृहात पाठविण्याचा आदेशही दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, खासगी फ्लॅटमध्ये वेश्या अड्डा चालत असल्याचा शहरातील पहिलाच प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. युवराज अरुण पोवार (३५, रा. भैरापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव), अनिकेत मारुती जाधव (२५, रा. संकेश्वर, ता. हुक्केरी), ओंकार कुमार पाथरवट (२५, रा. हुजरे गल्ली, गडहिंग्लज), यासिन फारूख नाईकवाडे (२८, रा. दुंडगा मार्ग गडहिंग्लज), सोहिलखान मोहमदअली पठाण (३२, रा. दुंडगा मार्ग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील युवराज, अनिकेत व ओंकार हे तिघेही अड्डा चालक, तर इतर दोघे ग्राहक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
हुजरे गल्लीतील अथर्व बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. काल (सोमवारी) काही महिला व ग्राहक येणार आल्याचे कळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. यामध्ये उत्तर प्रदेश व मुंबई येथील दोन महिलांसह सातही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७७ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल हॅंडसेट व रोख ६ हजार २६० रुपये जप्त केले. येणाऱ्या ग्राहकाकडून एक ते दोन हजार रुपये घेऊन पीडित महिलेला यातील पाचशे रुपये देऊन उर्वरित रक्कम चालक युवराज, अनिकेत व ओंकार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस कॉन्स्टेबल संपदा कुट्रे यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक गजानन सरगर अधिक तपास करीत आहेत.


चौकट...
रूम नं. ४०६ चे गूढ
अथर्व बिल्डिंगमधील रूम नं. ४०६ मध्ये अनोळखी पुरुष व महिलांचा अलीकडील काही महिन्यांपासून वावर असायचा. परिसरात याचे गूढ वाटत होते. अधून-मधून नव्याने येणाऱ्या या पुरुष व महिलांबाबत भागात चर्चाही सुरू होती. येथे गैरप्रकार सुरू असल्याचे दबक्या आवाजात बोललेही जायचे. त्यातूनच ही माहिती पोलिसांपर्यंत पोहचली आणि काल छापा टाकल्यानंतर या बिल्डिंगमधील रूम नं. ४०६ चे गूढ अखेर उकलले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com