विशाळगड पत्रकार परिषद

विशाळगड पत्रकार परिषद

Published on

लोगो ः विशाळगड अतिक्रमण प्रश्‍न

मुख्यमंत्र्यांचा बुलडोझर चालणार का?
संजय पोवार : राजकारण करणाऱ्यांनी गडाचे महत्त्व समजून घ्‍यावे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात मुख्यमंत्र्यांचा बुलडोझर चालणार का, असा प्रश्‍न दुर्गप्रेमी संजय पोवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. महाशिवरात्रीपूर्वी गड अतिक्रमणमुक्त करू म्हणणाऱ्या जिल्हा प्रशासनाची मोहीम थंड का झाली?, अशी विचारणा करत त्यांनी काही राजकीय नेत्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करत त्यांची १४ जुलैला वेळप्रसंगी गड पायथ्यालाच नावे जाहीर करू, असे स्पष्ट केले.
पोवार म्हणाले, ‘संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका कोणा धर्माच्या विरोधात नाही. गड संवर्धनाचे काम करत असताना, गडावर जे अतिक्रमण झाले आहे, त्याच्या ते विरोधात आहेत. मग ते अतिक्रमण कोणाचेही असो. ज्यांचा गडाशी संबंध नाही, असे परराज्यातील लोक गडावर येऊन राहिले आहेत, असा आमचा संशय आहे. ज्यांनी ऐतिहासिक गडाची मोडतोड केली, ते दोषी आहेत. पुरातत्त्व खात्याच्या परवानगीशिवाय गडावरील एक दगड हलवता येत नाही. मग गडावर बोअरवेल व टॉवरला परवानगी कशी काय देण्यात आली? गडावरील बालेकिल्ल्याचे दगड तर घरासाठी वापरले आहेत.’
ते म्हणाले, ‘जिल्हा प्रशासनाचे अतिक्रमणाला अभय आहे का, अशी शंका आम्हाला येत आहे. त्यामुळेच आम्ही कोणत्याही दबावाला घाबरणार नाही. जे नेते अतिक्रमणाविरोधात राजकारण करतात, त्यांनी गडाचे ऐतिहासिक महत्त्व समजून घ्यावे. सोशल मीडियावर दर्गाह पाडण्याचे रिल्स फिरत आहेत. त्याच्याशी आमचा संबंध नाही. केवळ गड अतिक्रमणमुक्त व्हावा, ही भूमिका असल्याने राज्यभरातील शिवभक्त विशाळगडावर येणार आहेत.’
संभाजीराजे यांनी विशाळगड व रांगणा किल्ल्यांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यातून दोन्ही गडाच्या तटबंदीचे काम केले होते. त्यांच्यामुळेच विशाळगडावर मद्यपान, पशुबळी देण्यास बंदी आली आहे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस राहुल शिंदे, हेमंत साळोखे, धनंजय खाडे, दीपक सपाटे, विकास देवाळे उपस्थित होते.
-------------
चौकट
हातोड्याचे पूजन....
पत्रकार परिषद सुरू होण्यापूवी हातोडा घेऊन कार्यकर्ते आले होते. टेबलवर त्याचे पूजन झाल्यानंतर परिषदेस सुरुवात झाली. हातोडा का आणला आहे? या प्रश्‍नावर हातोडा ताकदीचे प्रतीक असल्याने तो आणल्याचे स्पष्ट करण्यात आले.
---------------
चौकट
कारवाईची धमक दाखवा
विशाळगडावरील अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्काराची भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे. न्यायालयात काही पाठपुरावा करण्याचे कष्टही प्रशासनाने घेतले नाहीत. दीड वर्षांत न्यायालयात एकही तारीख घेतली नाही. अजून तीन दिवस आहेत. बैठकांचा खेळ दाखविण्यापेक्षा कारवाईची धमक दाखवा, असे पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.