

कोल्हापूर उत्तर
- लुमाकांत नलवडे
काँग्रेसला नडला अती आत्मविश्वास
कोल्हापूर, ता. २४ : उमेदवारी देण्यात महाविकास आघाडीत झालेला घोळ, दम देण्याची भाषा, माघारीच्या नाट्यमय घडामोडी, अशा प्रत्येक टप्प्यावर राजेश क्षीरसागर यांनी सावध भूमिका घेतली. तर यावेळी ‘हम करे सो कायदा’ या भ्रमात विरोधक राहिले. त्याचा थेट परिणाम मतदान यंत्रातून जनतेने दाखवून दिला. यालाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचीही साथ मिळाल्याचे आजच्या निकालावरून दिसून आले.
पेठेचा धप्पा..पेठेचा पॅटर्न... डोन्ट अंडर इस्टीमेट द पॉवर ऑफ थ्रोन (सिंहासन), कोल्हापूर ‘उत्तर’वर दक्षिण फ्री...काँग्रेसमुक्त कोल्हापूर.. कसा आहे दणका..., अशा वेगवेगळ्या टिप्पणीतून कार्यकर्त्यांनी त्यांची नाराजी आज स्टेटस ठेवून दाखवून दिली. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. तेथे कोणाला गृहित धरून चालत नाही. कोणी गृहित धरून चालले तर त्याचे परिणाम केवळ एका मतदारसंघात नाही तर जिल्ह्यात होतात हे आजच्या निकालातून दिसले.
महाविकास आघाडीत एकापेक्षा एक प्रश्न निर्माण झाले. कार्यकर्ता म्हणून राजेश लाटकरांना उमेदवार दिली. काही तासांत ती बदलून मधुरिमाराजे छत्रपती यांना दिली. त्यांना एबी फॉर्म दिला. त्यानंतरही त्यांनी माघार घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांनी वापरलेली भाषा राज्यभर गाजली. राजेश लाटकर यांच्या माघारीबाबत नेत्यांची संशयास्पद भूमिका जनतेला रुचली नाही. या घटनेमुळे छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या नाराज कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावला. तसेच फुटबॉलप्रेमी आणि पेठामध्ये राजघराण्याच्या अस्मितेला डिवचल्याची भावना निर्माण झाली. पुढे ‘पॅचअप’ झाले तरीही दुखावलेली मते शेवटी मतपेटीतून व्यक्त झाली.
विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेना शिंदे गटात आल्या. यापूर्वीचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना आपल्या पक्षात घेतले. मराठा महासंघाचे वसंत मुळीक यांचा पाठिंबा मिळविला. गतवेळी झालेल्या चुका कामाच्या माध्यमातून दुरुस्त केल्या. विरोधकांनी केलेला बदनामी करण्याचा प्रचार कसा खोटा आहे, हे दाखवून देण्यात क्षीरसागर यशस्वी झाले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार जोरजोरात वाजवून केला. महायुतीने त्याची आठवण मतदारांना क्षणाक्षणाला करून दिली. त्याचाही फायदा क्षीरसागर यांना झाला.
घडले काय?
१) काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ क्षीरसागरांच्या पथ्यावर
२) काँग्रेसवर अपक्ष उमेदवारास पाठिंबा देण्याच्या नामुष्की
३) माघारी नाट्यातील व्हिडिओचा विरोधकांकडून प्रचार
४) जयश्री जाधव, सत्यजित कदमांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला बळ
५) महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.