विजय अमल महाडिकांचा, पराभव सतेज पाटिलांचा

विजय अमल महाडिकांचा, पराभव सतेज पाटिलांचा
Published on

कोल्हापूर दक्षिण
- ओंकार धर्माधिकारी

प्रतिष्ठेच्या लढाईत महाडिकांची बाजी
कोल्हापूरः ‘दक्षिण’मधील ही संपूर्ण निवडणूक आमदार सतेज पाटील या नावाभोवती फिरत होती. प्रचारात विरोधक त्यांच्यावरच टीका करत होते. काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणूनही त्यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची होती. या लढतीत भाजपचे अमल महाडिक विरुद्ध काँग्रेसचे ऋतुराज पाटील होते. यात महाडिक विजयी झाले. मात्र, पराभव आमदार सतेज पाटील यांचा झाला.
---
ऋतुराज पाटील यांच्याकडे सतेज पाटील यांचे पुतणे म्हणूनच पाहिले गेले. दक्षिणमधील गावांचा पाणी प्रश्न, उपनगरातील नागरी समस्या या भांडवलावरच त्यांनी २०१९ मध्ये अमल महाडिक यांचा पराभव केला. मात्र, हेच मुद्दे घेऊन पुन्हा ऋतुराज पाटील यांना निवडणूक लढवावी लागली. काकांच्या छायेतून बाजूला येऊन स्वतःची वेगळी ओळख त्यांना निर्माण करता आली नाही. ऋतुराज यांना मोठा फटका त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांचा बसला. आपले नेते सतेज पाटील निवडणूक जिंकण्यात पटाईत आहेत. त्यामुळे आपण कसेही वागले तरी चालते, असा या कार्यकर्त्यांचा समज झाला. ‘मला काय आणि माझे काय’ हीच वृत्ती सर्वच पक्षातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांची असते. त्यांच्या चुकांचा फटकाही ऋतुराज पाटील यांना बसला. एका बाजूला भाजप हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडत होते. शहरी भागात या मुद्द्याला प्रतिसाद मिळतोय, असे स्पष्ट दिसत होते. मात्र, काँग्रेसला याला विरोध करणारा मुद्दा मांडता आला नाही. त्यामुळे त्यांचा शहरी भागावरचा वरचष्मा कमी झाला. काँग्रेसमधून काही नेते भाजपमध्ये गेले, तसेच भाजपमधील काही नेतेही काँग्रेसमध्ये गेले. सतेज पाटील यांना काँग्रेसची ही पडझड रोखता आली नाही. लाडकी बहीण योजना, हिंदुत्वाची साथ भाजपला मिळालीच; पण गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांनी सभांमधून काँग्रेस, ऋतुराज पाटील आणि सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला; पण त्याचे प्रत्युत्तर देणारा दुसरा नेता काँग्रेसकडे नव्हता. याचा फटका ऋतुराज पाटील यांना बसला.

घडले काय?
१) ऋतुराज पाटील यांना स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता आले नाही
२) दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची चूक भोवली
३) काँग्रेसच्या नेत्यांना प्रचारात प्रभावी मुद्दे मांडता आले नाहीत
४) हिंदुत्व आणि लाडकी बहीण योजनेचा प्रभाव अधिक
५) भाजपच्या टिकेला उत्तर देण्यात काँग्रेस अपयशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com