रात्री अकरा वाजताच शहरात ‘सन्नाटा’

रात्री अकरा वाजताच शहरात ‘सन्नाटा’

Published on

72773
कोल्हापूर ः पोलिस गस्त अन् नाकाबंदीमुळे रात्री अकरा वाजताच शहरातील मुख्य चौकात असा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
--
शहरात रात्री अकरालाच ‘सन्नाटा’
रात्रगस्त, नाकाबंदी वाढवली ः विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ः रात्री-अपरात्री शहरात फिरणारी टोळकी, मैदाने, उद्यानात चालणारे ओपनबार, मावा, सिगारेटसाठी होणाऱ्या हाणामारी, शहरातील काही दिवसांपूर्वीचे चित्र बदलण्यासाठी पोलिसांनी रात्र गस्तीत बदल केले आहेत. रात्री साडेदहानंतर पोलिस रस्त्यावर उतरून गर्दी कमी करीत आहे. मध्यरात्रीपर्यंत टवाळखोरांचा आसरा असणाऱ्या पानटपऱ्या, वाईनशॉपी, हॉटेल्सवर होणाऱ्या कारवायांनी अकरानंतर शहरात ‘सन्नाटा’ दिसत आहे. सर्वसामान्यांमधून कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोयही होत आहे.

शहरासह ग्रामीण भागातील गुन्हेगारी, चोरीच्या घटना रोखण्यासाठी मुख्य चौकांत पोलिस तैनात केले जात आहेत. नाकाबंदीतून शहरात येणाऱ्या वाहनांनी नियमित तपासणी सुरू आहे. शहरात मध्यरात्रीपर्यंत असणारी गर्दी हटकण्यासाठी संबंधित ठाण्याकडून रात्री अकरापासूनच गस्त सुरू केली आहे. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांवर रात्री अकरानंतरच शुकशुकाट दिसू लागला आहे. नूतन पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्वतः शहरात भेटी देऊन याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केल्याने विनाकारण फिरणाऱ्या टोळक्यांवर नियंत्रण शक्य झाले आहे.

दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, टेंबलाई उड्डाणपूल, राजारामपुरी, सायबर चौक, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, गंगावेश, रंकाळा स्टॅन्ड, महाद्वार रोड, उभा मारुती चौक, शिवाजी पूल अशा ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत यापूर्वी गर्दी दिसून येत होती. मात्र, निर्माण चौक, वारे वसाहत परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनांनंतर पोलिसांनी रात्री कट्ट्यावर बसणाऱ्यांना अटकाव केला आहे. या सर्व चौकात पोलिसांची वाहने रात्री ११ वाजता दाखल होतात.

प्रवेशद्वारावर तंबू
शहरात येणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गांवर कापडी तंबू उभारले आहेत. पोलिसांकडून रात्री दहानंतर या चौकात नाकाबंदी करून वाहने तपासली जातात. ट्रिपलसीट, विना सीटबेल्ट चालक, जादा प्रवासी वाहतूक, मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईही सुरू केल्याने चालकांत सुधारणा दिसत आहे.

खासगी वाहनांतून पाहणी
रात्री अकरानंतर शहरात पोलिस तैनात असतात. याची पाहणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक गुप्ता यांचाही फेरफटका असतो; परंतु यासाठी पोलिस अधीक्षकांनी शासकीय वाहनांचा वापर न करता खासगी वाहनातून अनेकदा पाहणी केली. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांतही याबाबत अधिक सतर्कता बाळगली जात आहे.

परजिल्ह्यातून आलेल्या
प्रवाशांची गैरसोय
मध्यवर्ती बस स्थानक, तावडे हॉटेल येथे रात्री उशिरा काही प्रवासी उतरतात. सलग प्रवासामुळे कोल्हापुरात पोहोचल्यानंतर काही खाऊ असे ठरवून आलेल्या प्रवाशांची गैरसोय होते. फेरिवाल्यांचे गाडेही ११ वाजताच बंद होत आहेत.
--
कोट
कोल्हापूर हे ठिकाण कर्नाटक, गोवा, कोकण विभागात जाणाऱ्या वाहनधारकांसाठी मध्यवर्ती आहे. फेरीवाला धोरणातही विशिष्ट वेळी व्यवसाय करण्यासाठी मुभा आहे; पण पोलिस प्रशासनाने स्वतःचे स्वास्थ्य सांभाळण्याच्या प्रयत्नात कोणालाही विचारात घेतलेले नाही. उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे, याबाबत फेरीवाल्यांशी चर्चा होणे अपेक्षित आहे.
- रघू कांबळे, उपाध्यक्ष, जिल्हा फेरीवाला संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com