हवा करवीरची...

हवा करवीरची...
Published on

हवा करवीरची...२० एप्रिल २०२६ साठी

आम्हालाही घ्या...
शहर सौंदर्यीकरणाबाबत महापौरांनी विविध संस्थांशी चर्चा करून ठोस कामे करण्याचे अंतिम नियोजन केले. त्याची शेवटच्या टप्प्यातील बैठक होत असताना ‘कुठं काय बोलायचं‘ हेच माहिती असल्याने ‘प्रसिद्धी’ मिळवण्याचा फंडा माहिती असलेला एक नगरसेवक अस्वस्थ होता. संस्थांचे प्रतिनिधी सांगत होते, त्यात काय बदल करायचा ते महापौर, पदाधिकारी, अधिकारी सांगत होते. त्या नगरसेवकाच्या हाताला प्रसिद्धीचे काहीच लागत नव्हते. त्यातून तो मधूनच उठला व असंबद्ध बोलू लागला. त्याच्या पक्षातील सहकाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही त्याने आम्हालाही घ्या, आम्हाला वगळून काही करू नका असे सांगू लागला. त्यामुळे बैठकीत काही काळ साऱ्यांचेच मनोरंजन झाले.
--------
‘मला फक्त दोनच मिनिटे?‘
शहरालगत असलेल्या सरनोबतवाडीमधील विकास विद्यामंदिर शाळेत रविवारी माजी विद्यार्थी मेळावा रंगला. माजी विद्यार्थी, शिक्षक आले. उल्लेखनीय कामगिरी करुन यशस्वी झालेल्या काहींच्या सत्कारानंतर मनोगते व्यक्त होऊ लागली. काहीजण शाळेबाबतच्या आठवणी सांगण्यात इतके रमले की, त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. एकीकडे उन्हाचा वाढता तडाखा आणि दुसरीकडे लांबलेले मनोगत, यामुळे उपस्थितांचा संयम सुटत होता. त्यात एक शिक्षक बोलायला उभे राहत असतानाच संयोजन समितीतील कार्यकर्ते माईक घेऊन ‘कृपया मनोगत व्यक्त करणाऱ्यांनी फक्त दोन मिनिटांत बोलावे’, असे आवाहन केले. त्याला बोलण्यास उभारलेल्या शिक्षकांनी, ‘कदाचित यांना माहिती आहे की, मी जादा वेळ बोलणार, म्हणूनच त्यांनी मला दोन मिनिटे दिली’, अशी मिश्कीलपणे टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये जोरदार हास्य फुलले.

----------------
ते साहेब ‘धुरंधर..’ हे ‘धुरंधर टू...’
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे सहायक निबंधकांचे कार्यालय चर्चेत आले आहे. नुकताच येथील एका साहेबांची तडकाफडकी बदली झाली. नवीन साहेब हजर झाल्यानंतर छोटेखानी कार्यक्रम झाला, शुभेच्छा आणि स्वागत. कार्यालयाबाहेर पत्रकार आहेत समजल्यावर त्यांनाही आत बोलवण्यात आले. यावेळी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केले. एका कर्मचाऱ्यांनी दिल से बात केली... यापूर्वीचे साहेब ‘धुरंधर’ होतेच; पण आत्ताचे साहेब ‘धुरंधर टू’ आहेत असे सांगून टाकले. यावर एकच टाळ्या झाल्या.
---------------
कोंबड्याला शाबू घाला...
भोगावती साखर कारखान्याच्या दुकानगाळे धारकांनी एक दिवस पार्टीचे नियोजन केले. पार्टी म्हंटली मांसाहारी पदार्थ आलेच. ‘कुठं बसायचं‘ हेही ठिकाण ठरलं. पार्टीत दोघेजण शाकाहारी. त्यांच्यासाठी एक जगन्नाथ व्यापाऱ्याने सल्ला दिला आणि म्हणाला, कशाला लांबड लावतासा आज संध्याकाळी कोंबड्याला शाबू खायला घाला आणि उद्याला त्योच कोंबडा कापा. शाबू खाल्ल्यानं कोंबडा शाकाहारी होतो. असं म्हटल्यावर सगळ्यांच्या या एकाच हशा उसळला; पण शाकाहारी भांबावून गेले.
------------------
आज तुम्ही, उद्या आम्हीच...
महापालिकेत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसच्या गटनेत्यांच्या कार्यालयांची थाटामाटात उद्‍घाटने झालीत. हा जरी कार्यक्रम दिसत असला तरी महापालिकेतील सत्ताधारी महायुतीसाठी संदेश दिल्यासारखेच होते. सत्ता जरी तीन पक्षांची मिळून झाली असली तरीही मोठा पक्ष कॉंग्रेसच आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांना भविष्यातील वाटचालीचा इशारा दिला आहे. त्याचीच चर्चा महापालिकेच्या चौकात होती. विरोधी आघाडी आहे की सत्ताधारी आहेत, याचं कोडं कर्मचारी, नागरिकांना पडलं. कदाचित भविष्यातील तयारी आतापासून चालवली आहे का? असाही अनेकांना प्रश्‍न पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com